केदारे परीवाराची सतर्कता ; बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणाने संताप
मुक्ताईनगर :- शहरातील पोलीस वसाहतीतील गटारीसाठी खोदण्यात आलेल्या पाच फूट खोल व पाण्याने भरलेल्या खड्ड्यात खेळता-खेळता एक चिमुरडा खड्ड्यात पडला तर त्याला वाचवण्यासाठी धडपड करताना दुसरा भाऊही पडला मात्र वेळीच केदारे परीवाराने सतर्कता दाखवत वेळीच चिमुरड्यांना बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले. मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणाविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाविषयी संताप
शहरातील पोलीस वसाहतीत गटारीचे काम सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने गटारीसाठी पाच फूट खोल खड्डा खोदला असून त्यात अंगणवाडीत शिकणारी शेख रिजवान शेख व अली शेख सादीक हे दोन भावंडे मंगळवारी दुपारी दोन वाजता पडली. हे दृश पाहताच कांतीलाल केदारे यांचे वडील तथा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुनील केदारे यांना दिसताच त्यांनी त्या भावंडांना वेळीच बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले. बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. उघडा खड्डा तातडीने बुजवावा तसेच सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रहिवासी करीत आहेत. अपूर्ण कामामुळे दुर्गंधी सुटली असून साथीचे आजार बळावण्याची भीती व्यक्त होत आहे.