पाण्यासाठी एरंडोलात हंडा मोर्चा

0

पाणीपुरवठा सुरळीत करण्यासह गटारींचे बांधकाम करण्याची मागणी
अनुपस्थितीमुळे नगराध्यक्ष, मुख्याधिकार्‍यांच्या खुर्चीला महिलांनी घातला हार

एरंडोल- प्रभाग क्रमांक दोन मध्ये नवीन जलवाहिन्या टाकून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, प्रभागातील नवीन वसाहतींमध्ये त्वरित गटारींचे बांधकाम करण्यात यावे यासह अन्य विविध मागण्यांसाठी आज सकाळी पालिका कार्यालयावर महिलांनी हंडा मोर्चा काढला. मोर्चा पालिका कार्यालयाजवळ आला असता कार्यालयात नगराध्यक्ष व मुख्याधिकारी अनुपस्थित असल्यामुळे संतप्त झालेल्या मोर्चेकरी महिलांनी नाराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला हार घालून तेथे बांगड्या फेकून निषेध नोंदविला. नगरसेविका हर्षाली प्रमोद महाजन, दर्शना विजय ठाकूर, कल्पना दशरथ महाजन,प्रतिभा चिंतामण पाटील यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.मोर्चा भर उन्हात काढण्यात आलेल्या मोर्चात महिला व अल्पवयीन मुली मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.मोर्चात सहभागी झालेल्या अल्पवयीन मुलींच्या हातातील फलक शहरवासियांचे लक्ष वेधून घेत होते. दोन महिन्यात प्रभागातील कामे होती, असे आश्‍वासन यावेळी देण्यात आले.

जलवाहिन्या जीर्ण
सकाळी अकरा वाजता गजमल नगर येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा नेण्यात आला. प्रभाग क्रमांक दोनमध्ये अनेक वर्षापासून पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या प्रभागातील जलवाहिन्या जीर्ण झाल्या असून रहिवाशांना पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. तसेच याच प्रभागातील नवीन वसाहतीमध्ये गटारींचे बांधकाम केलेले नसल्यामुळे सांडपाण्याची समस्या निर्माण झाली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रभाग क्रमांक दोनच्या नगरसेविका हर्षाली प्रमोद महाजन व दर्शना विजय ठाकूर यांनी पालिकेच्या सभेत विषय उपस्थित करून देखील कामे करण्याबाबत दुर्लक्ष करण्यात येत होते. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी नगरसेविका हर्षाली महाजन व दर्शना ठाकूर यांचे नेतृत्वाखाली मोर्चा काढला.

कार्यालय अधीक्षकांनी स्वीकारले निवेदन
मोर्चा पालिका कार्यालयाजवळ आला असता पालिकेचे कार्यालय अधीक्षक संजय धमाळ यांनी मोर्चेकर्‍यांचे निवेदन स्वीकारले. दोन महिन्यात प्रभागातील कामे करण्यात येतील असे लेखी आश्‍वासन पालिकेतर्फे देण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दशरथ महाजन, नगरसेविका हर्षाली महाजन, दर्शना ठाकूर, प्रमोद महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. दोन महिन्यात कामे न झाल्यास पालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

उपोषणाचा इशारा
मोर्चात शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील,तालुका संघटक सुनील मानुधने,शहर प्रमुख प्रसाद दंडवते,माजी नगरसेवक संजय महाजन,सुनील चौधरी,चिंतामण पाटील,आरीफ मिस्तरी,प्रमोद महाजन,सुनील मराठे,गोरख महाजन,प्रकाश शिंदे,हिराबाई चौधरी,रजूबाई चौधरी,इंदुबाई पाटील,यमुनाबाई चौधरी,रजिया खाटिक यांचेसह महिला व पुरुष तसेच शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.दरम्यान मोर्चाची पुर्व कल्पना देवून देखील तसेच निवेदन देवून देखील मुख्याधिकारी गैरहजर राहिल्याबद्दल उपस्थित महिलांनी नाराजी व्यक्त केली.