पाण्यासाठी तिने खोदली 60 फुटांची विहीर

0

सिरसी (कर्नाटक)। पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार्‍यांना पाण्याची खरी किंमत कळते. नाहीतर बर्‍याच ठिकाणी पाण्याचा अपव्ययच होत असतो. आजही देशातील अनेक खेड्यापाड्यात गावकर्‍यांना मैलोनमैल चालत जाऊन पाणी आणावे लागत आहे. पाणी मिळवण्यासाठी महिलेने चक्क विहीर खणल्याची घटना कर्नाटकातील सिरसी येथे घडली. गौरी नायक असे या महिलेचे नाव आहे.

51 वर्षांच्या गौरीनेे पाण्यासाठी एकटीने विहीर खणली आहे. त्यामुळे कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यातील लोक तिला आता लेडी भगीरथ नावाने ओळखू लागली आहेत. गौरी या सिरसीतल्या गणेशनगर भागात राहतात. त्यांच्या नारळाच्या आणि पोफळीच्या झाडांना पाणी हवे म्हणून त्यांना विहीर खोदायची होती. पण पैसे नसल्याने अखेर स्वत:च त्यांनी विहीर खणायचे ठरवले. गौरी एका मुलाच्या आई असून गणेशनगरात वेठबिगारी करतात. त्यांनी सुमारे 150 पोफळीची आणि 15 नारळाची तर काही केळींची झाडे घराभोवती लावली आहेत. गौरी धर्मस्थळ ग्रामविकास योजनेच्याही सदस्य आहेत. त्या बैठकीला येत तेव्हा अंगदुखीची तक्रार करत. पण त्यांनी विहीर खणली आहे हे आम्हाला ठाऊकच नव्हतं. आम्ही घरी गेलो तेव्हा कळलं, योजनेचे अधिकारी विनोद म्हणाले तसेच अनेक गावकर्‍यांनाही याबाबत फार उशिरा कळाल्यावर त्यांनाही हे ऐकून आश्‍चर्याचा धक्काच बसला.

दररोज नित्यनेमाने त्या विहीर खणत असत. दररोज 5 ते 6 तास गौरी खोदकाम करत असत. रोज किमान चार फुटांचा खड्डा त्या खणत. केवळ शेवटच्या काही दिवसांत त्यांनी माती उपसायला तीन महिलांना मदतीला घेतले. आता गौरी यांच्या मालकीच्या या 60 फूट खोल विहिरीत 7 फूट पाणी आहे. तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर विहिरीला पाणी लागले.