जामनेर । तालुक्यातील तोंडापुर येथे ग्रामस्थांना सुरळीतपणे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने अंबीका नगरातील महीला व पुरूषांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढुन सरपंचाला चांगलेच धारेवर धरले अंबीका नगर भागांत तब्बल एक महिन्यापासून नळांना पाणी येत नसल्याने ग्रामस्थांनी संतापून आज ग्राम पंचायतीला कुलुप ठोकले असल्याचे समजते. गावात काही भागात सुरळीत पाण्याचा पुरवठा केला जात असून ग्रामपंचायतीच्या कर्मचार्यांच्या हलगर्जीपणामुळे चांगल्या पाण्याचा पुरवठा न होता पिण्यासाठी नळातून गढुळ पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचा आरोप करून गढूळ व दुषीत पाण्याने भरलेल्या हंड्यातुन सरपंच प्रकाश सपकाळ यांच्यासमोर पाणी सांडून निषेध करण्यात आला.
दाखल्यासाठी नागरीकांची पायपीट
ग्रामपंचायतीला कुलुप ठोकल्याने शाळेत नाव दाखल करण्यासाठी लागणारे ग्रामपंचायातीचे रहीवासी दाखले लवकर न मिळू शकल्याने काही विद्यार्थी व पालकांना ग्रामपंचायत कार्यालयाभोवती पायपीट करावी लागली. दरम्यान सरपंच प्रकाश सपकाळ यांनी जामनेर पंचायत समीतीच्या संबंधित अधिकारी व पोलीस प्रशासन यांना बोलावून त्यांच्या बंदोबस्तात ग्रामपंचायत कार्यालयाला ठोकलेले कुलूप उघडण्यात येवून दैनंदिन कामकाज सुरळीत चालु करण्यात आले.