पाण्यासाठी महिलांची ग्रामपंचायतीवर धडक

0

भुसावळ । तालुक्यातील कंडारी येथे गेल्या दोन दिवसांपासून पाणी पुरवठा पुर्णपणे खंडीत झाला आहे. यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असनू पाणी पुरवठ्याच्या समस्येमुळे संतप्त झालेल्या महिलांनी दुपारच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यलयावर धडक देऊन सरपंचांच्या दालनाचा ताबा घेऊन संताप व्यक्त केला.

दर महिन्याला भेडसावते पाणी पुरवठ्याची समस्या
कंडारी गावात दर महिन्याला पाणी पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार होत असतात यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ऐन उन्हाळ्यात तापी नदी पात्रात पाणी असूनही ग्रामस्थांना पाणी मिळू शकत नाही. काही दिवसांपूर्वी तब्बल 15 दिवस गावाचा पाणी पुरवठा बंद होता मात्र आता पुन्हा ग्रामपंचायतीने विज बिल थकविल्याने विज कनेक्शन बंद करण्यात आल्यामुळे पाणी पुरवठा देखील खंडीत झाला आहे. यामुळे नागरिकांना आता पाणी मिळणे दुरापास्त झाल्याने संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीवर धडक देऊन पाणी सोडणार नाही तोपर्यंत दालनाचा ताबा देणार नाही अशी भुमिका घेतली होती. मात्र काही पदाधिकार्‍यांनी समजूत घातल्याने महिला माघारी परतल्या.