फुरसुंगी । येथील कुमार प्रॉपर्टीज यांच्या पार्क इन्फिनिया हाउसिंग सोसायटीमधील नागरिकांना जून 2009पासून पाणीटंचाईच्या भीषण समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ऐन पावसाळ्यातसुद्धा ही परिस्थिती बदलेली नाही. या पार्श्वभूमीवर अखेर संतप्त झालेल्या सोसायटीमधील रहिवाशांनी सकाळी रिकामा हंडा आणि कळशी घेऊन रस्त्यावर उतरत आपला रोष व्यक्त केला. यावेळी सोसायटीची पाण्याच्या समस्यांची एकदाच कायमस्वरूपी व्यवस्था करावी आणि आजपर्यंत पाण्यासाठी झालेला सर्व खर्च बिल्डरने सोसायटीकडे जमा करावा, अशी मागणी सोसायटीतील रहिवाशांनी यावेळी केली.
सोसायटीचा पाण्याचा प्रश्न, कचरा व्यवस्थापनाची जुनाट व खर्चिक यंत्रणा, सिक्युरीटीसाठी सेंट्रल कंट्रोल रूम, मेनगेटवर बॅरिअर गेटची व्यवस्था, सोलर लाईटची व्यवस्था, साडंपाण्यासाठी बनविलेली अरुंद स्वरुपाचे ड्रेनेज, सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्टची अपुरी व्यवस्था, वॅाटर ट्रीटमेंट प्लॅन्टची अपुरी व्यवस्था इत्यादी मागण्यांसाठी वारंवार निवेदन देऊन सुद्धा त्यावर कोणतीही कार्यवाही आजपर्यत झालेली नाही. आता पाणी टंचाईने ग्रासलेल्या सोसायटीतील महिलाही आक्रमक होऊन हंडा-कळशी घेऊन आज रस्त्यावर उतरल्या असल्याने यावर तोडगा निघाला नाही तर अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. पाणी टंचाईचा प्रश्न गेल्या काही महिन्यापासून अधिकच तीव्र झाला असून आम्ही किती दिवस पाणी विकतच घ्यायचे असा संतप्त सवाल यावेळी महिलांनी व सभासदांनी उपस्थित केला आहे. हे सर्व प्रश्न निकाली लावली नाही तर मे महिन्यात तीव्र आंदेलन करण्यात येईल. असा इशारा सोसायटीचे अध्यक्ष अजय कुदळे, सेक्रेटरी अशोक जाधव, सिनियर सिटीझन फोरमचे अध्यक्ष परब, सोसायटी संचालक मंडळ व सभासदांनी दिला आहे.