पाण्यासाठी लालटोपीनगरचे महापालिकेसमोर आंदोलन

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या पाठीमागील लालटोपीनगर, मोरवाडी गावठाण, म्हाडा, अमृतेश्‍वर कॉलनीत गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याच्या निषेधार्थ झोपडपट्टी मजुर असोसिएशनने गुरुवारी महापालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. तसेच आपल्या समस्येविषयी आयुक्तांना निवेदन दिले.

लालटोपीनगर, मोरवाडी गावठाण, म्हाडा, अमृतेश्‍वर कॉलनीत गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. काही तासापुरताच पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या भागात गोरगरिब कुटुंब राहत आहेत. पाणीवेळेत येत नसल्यामुळे नारिकांना कामावर वेळेत जाता येत नाही. पाण्याच्या समस्येबाबत वारंवार पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात. बघतो करतो, अशी उत्तरे दिली जातात. तसेच लालटोपीनगर झोपडपट्टीत विविध नागरी सुविधांची वानवा असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर कविता खराडे, नसिमा सैय्यद, ललीता जोशी, शंकर तायडे, प्रवीण भोसले, शाम जोशी, लक्ष्मी जोशी, मेहबुब शेख यांच्या स्वाक्षरी आहेत.