धुळे। धुळे जिल्ह्यात सर्वत्र पाणी टंचाईचे सावट निर्माण होत असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील सोनगीर गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून गेले चार महिने पाण्याची झळ सोसणार्या सोनगीरकर महिलांनी थेट जिल्हाधिकार्यांची भेट घेत हा पाणीप्रश्न सोडविण्याची विनंती केली.
सोनगीर हे गाव मुंबई-आग्रा महामार्गावर असून या गावाला शाश्वत पाणीपुरवठ्याची सोय नाही. गावाजवळून जात असलेल्या तापी पाईप लाईनमधून गाव परिसरातील विहीरी भरण्यात याव्यात तसेच गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. सोनगीरकरांची पाणीटंचाई वेळीच दूर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सोनगीरकरांनी दिला असून जिल्हाधिकार्यांना निवेदन देतांना पंचायत समिती सदस्या रुपाली माळी, शकुंतला चौधरी, डॉ.सिमा सोनवणे, प्रतिभा लोहार, रजनी गुजर, छाया परदेशी, शारदा मोरे, जयश्री लोहार, ग्रा.पं.सदस्या पुष्पा भोई, विमलबाई पावनकर, वैशाली चौधरी,ज्योती चौधरी, छाया कासार, रत्ना पाटील, मिनल पाटील, दीपा वानखेडे, संगिता पाटील, निता खत्री, अर्चना पाटील, शोभा ठाकरे, डॉ.सुजाता आढे आदी उपस्थित होते.
तर हातपंप उखडून आणू !
तालुक्यातील जुना व नवा चांदसूर्या येथे गेल्या 2 महिन्यापासून हातपंप व बोरवेल बंद असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण होत आहे. त्याबाबत तात्काळ गटविकास अधिकारी पंस शिरपुर येथे भेट घेऊन वरील प्रकाराची माहिती भाजपा शहर अध्यक्ष हेमंत पाटील, यु.मो.जि.उपाध्यक्ष हेमराज राजपूत, चंद्रकांत पाटील यांनी चर्चेदरम्यान तक्रार दिली. सदर हातपंप व बोरवेल 48 तासात सुरू ना झाल्यास थेट चांदसूर्या येथून बंद असलेला हातपंप उखडून आणून पंचायत समितीतील अधिकार्यांचा दालनासमोर गाडण्यात येईल असा इशारा हेमंत पाटील व भाजपा पदाधिकार्यांनी पंचायत समिती प्रशासनाला दिला.