चार महिन्यांपासून गावावर जलसंकट ; ग्रामपंचायतीच्या सभेपूर्वीच मोर्चा धडकल्याने उडाली धांदल
यावल- तालुक्यातील हिंगोणा येथे पाणीप्रश्न बिकट बनल्याने व त्यातच मुख्य जलवाहिनी अज्ञात माथेफिरून फोडल्याने पाण्यासाठी आसुसलेल्या संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढून कार्यालयालाच कुलूप ठोकल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेमुळे ग्रामपंचायतीची सभा रद्द करण्यात आली. प्रसंगी महिलांनी पाण्यासाठी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी महिलांनी ग्रामपंचायतीवर प्रशासक बसवावा, अशी मागणीही केली.
मोर्चामुळे मासिक सभा रद्द
परीसरातील विहिरींच्या जलपातळीत झालेली घट त्यातच पाण्याअभावी शेतकर्यांनी पाण्याअभावी केळीबागा उपटून फेकल्याचे परीसरात चित्र आहे तसेच हिंगोणा गावालादेखील 40 ते 45 दिवसांनी पाणी मिळत असताना अज्ञात इसमाने मुख्य पाईप लाईन फोडल्याने महिलांच्या संतापाचा उद्रेक झाला. शुक्रवार, 10 मे रोजी सकाळी 10 वाजता गावातील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा आणत संताप व्यक्त केला तसेच ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयात पाणीटंचाई निवारणासाठी विशेष मासिक सभा असल्याने सभा सुरू होण्या अगोदरच गावातील महिलांचा मोर्चा आल्याने ग्रामविकास अधिकारी व कार्यकारी मंडळाची एकच धांदल उडाली त्यामुळे ही सभा रद्द करण्यात आली.
शासन निधीचा अपव्यय होण्याची भीती
हिंगोणा गावापासून सात किमी अंतरावर असलेल्या मोर मध्यम प्रकल्पाचा गावाला काडीमात्र फायदा नाही तसेच गावात मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत अंदाजित 47 लक्ष रुपये इतका निधी जलवाहिनीसाठी व जलकुंभासाठी खर्च होणार असून त्यातही ट्युबवेल व विहिर यांचा समावेश नसल्याने या योजनेचा गावासाठी फायदा होणार नसल्याचे बोलले जात आहे. परीणाम शासन निधीचा अपव्यय होणार असल्याची चर्चा आहे.
तात्पुरत्या स्वरूपात प्रश्न सोडवला -ग्रामविकास अधिकारी
ग्रामविकास अधिकारी आर.ई.चौधरी म्हणाले की, गावातील पाणीटंचाई बघता तात्पुरत्या स्वरूपात पाणी प्रश्न सोडविण्यासाठी काही शेतकर्यांकडून त्यांच्या विहिरीचे पाणी जोडण्यात आले आहे. हिंगोणा तलाठी डी.एच.गवई म्हणाले की, गावातील भीषण पाणीटंचाई पाघता गावाच्या आजूबाजूच्या विहिरीची पाहणी करून यावल तहसीलदार यांना 6 रोजी झालेल्या बैठकीत आठ विहिरी अधिग्रहण करण्याबाबत प्रस्ताव पाठवला आहे.
लवकरच सुटणार पाणीप्रश्न -सरपंच
सरपंच सत्यभामा शालिक भालेराव म्हणाल्या की, दिवसेंदिवस जल पातळीत घट होत असल्याने पाण्याची जलपातळी 400 ते 500 फूट खोल गेल्याने गावात पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी काही शेतकर्यांकडून पाणी घेतले आहे. ग्रामपंचायत मालकीच्या जलस्वराज्य विहिरीत कॉम्प्रेसर टाकून पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.