पाण्यासाठी हिंगोण्याच्या रणरागिणी पंचायत समितीवर धडकल्या

0

गटविकास अधिकार्‍यांना निवेदन ; अस्वच्छतेने आरोग्य आले धोक्यात ; ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींबाबत महिलांनी व्यक्त केला संताप

यावल: – तालुक्यातील हिंगोणा येथे दर 15 दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने भर उन्हाळ्यात महिलांची भटकंती होत असल्याने प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी तसेच स्वच्छतेअभावी ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आल्याने त्या संदर्भात नाराजी व्यक्त करीत हिंगोण्यातील महिलांनी पंचायत समिती गाठत तीव्र संताप व्यक्त केला. याप्रसंगी विविध मागण्यांचे गटविकास अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

गटारी तुडूंब, आरोग्य धोक्यात
हिंगोणा गावात गेल्या आठ महिन्यांपासून स्वच्छता होत नसल्याने आरोग्य धोक्यात आले आहे शिवाय 15 दिवसात एखाद्या वेळी पाणी मिळत असल्याने रणरणत्या उन्हात पाण्यासाठी भटकंतीची वेळ महिलावर्गावर आली आहे. पाणी येण्याची वेळ निश्‍चित नसल्याने अनेकदा शेती कामांचादेखील खोळंबा होतो. ग्रामपंचायतीत तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर तेथेदेखील कुणी उपलब्ध राहत नसल्याची स्थिती आहे. हिंगोणा गावातील गटारी तुडूंब भरल्या असून स्वच्छतेअभावी आरोग्य धोक्यात आले आहे. गावात अनेकांनी अवैधरीत्या पाईप लाईनवरुन कनेक्शन घेतले असून त्याबाबतही चौकशीची मागणी करण्यात आली.

यांचा मोर्चात सहभाग
नारी शक्ती संघटनेच्या अध्यक्षा नीता गाजरे, लता राणे, छाया राणे, यमुना बढे, जयश्री भारंबे, कल्पना कुरकुरे, स्नेहा कुकरे, कविता कुरकुरे, अर्चना बर्‍हाटे, सुमन महाजन, रवींद्र बोंडे, भावना कुरकुरे यांच्यासह 50 वर महिला उपस्थित होत्या. ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी महिलांनी याप्रसंगी करीत घोषणाबाजी केली.

हिंगोणा ग्रा.पं.चे ऑडीट तपासणार
महिलांनी हिंगोणा ग्रामपंचायतीच्या स्पेशल ऑडीटची मागणी केली असून त्याबाबत चौकशीकरण्यात येईल. वेळप्रसंगी 39 अ नुसार कारवाईचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे पाठवला जाईल, असे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाय.पी.सपकाळे यांनी सांगितले.