शहादा (भरत शर्मा) : मागील काही वर्षात शहादे शहराचा विस्तार हा मोठ्या प्रमाणावर झाला आहे. मात्र त्याआवश्यक असलेल्या गोष्टींचे नियोजन मात्र झालेले नाही. पाण्याच्या योजनांवर खूप मोठ्या प्रमाणवर निधी खर्च झालेला आहे. तरीही समस्या मात्र आजपावेतो तशीच्या तशी आहे. ८०० रुपयाची पाणीपट्टी असतांना पाण्यासाठी जेवढे हाल होत होते. २००० पाणी पट्टी भुरुनही तेच हाल आहेत. उलट त्यापेक्षा जास्त हाल असते. अनेक ठिकाणी ४ दिवसाआड पाणी देण्यात येत आहे. शहरात अनेक वर्षांपासून सारंगखेडा येथून तापी नदीवरुन शहादा शहराचा पाणी पुरवठा करण्यासाठीची जवळपास २० कोटीची योजना सुरु करण्यात आली. योजना सुरु होण्याअगोदर पासून पाणी पट्टी वाढवून ८०० वरुन २००० पर्यंत करण्यात येऊनही अजूनपावेतो शहरवासियांना ह्या तापीच्या पाण्याचे दर्श नाही आणि केव्हा होईल याची शाश्वती सुद्धा नाही.
जलस्त्रोतांकडे दुर्लक्ष
वास्तविक पहाता शहराला उपलब्ध असलेल्या नैसर्गिक जलस्तोत्रांचे जर काळानुसार करण्यात आले असते तर शहराला ह्या समस्यांना सामोरे जाण्याची वेळ आली नसती. शहरालगत वाहणारी गोमाई नदी तीचे पात्र जर योग्य रितीने सांभाळले असते तर दूसरीकडे नाण्याची गरजच भासली नसती. मात्र शहराची व शहरवासियांची आजारी मानसिकताच ह्या सगळ्यांसाठी कारणीभूत आहे. नगरपालिका प्रशासनाकडे तर एवढीही दुरदृष्टी नाही की भविष्यात जेव्हा शहराचा विस्तार होईल तेव्हासाठीचे पिण्याच्या पाण्याचे जलविस्तारणाचे नियोजन काय? मात्र शहादे शहराला अधिकारी, पदाधिकारी ह्या नितीचे मिळाले नाहीत की, ज्यांच्यमध्ये शहराप्रती दूरदृष्टी व शहराप्रती आस्था असावी. जे आले त्यांनी फक्त त्यांचा कार्यकाळ पूर्ण करण्यावरच भर दिला आहे. दिवसेंदिवस पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढत आहे.
नियोजन नसल्याने समस्या वाढली
शहरालगत असलेल्या नदीवर जर पाणी अडविण्यासाठीची सोय करण्यात आली असती तर पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासननाला सारंगखेडापर्यंत पाईपलाईन बसविण्याची गरज भासली नसती. गोमाई नदीवर सुसरीसारखे अजून पाच ते सहा ठिकाणी जर हे पाणी अडविण्यात आले असते आणि शहरालगत गोमाई नदीची झालेली गटारगंगा शहरवासियांसाठी नदीपात्रात केलेली थान नगरपालिकेच्या मुर्खपणाच्या कळस म्हणजे नदीपात्रातच सोडण्यात आलेले गटारीचे घाण पाणी त्यामुळे शहराचे आरोग्यही धोक्यात आलेले आहे. अनेक रोगांचा प्रादुभाव शहरात वाढत आहे. शासन याची जबाबदारी घेण्यात तयार नाही आणि शहर प्रशासन सुद्धा ह्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. नगरपालिका सांभाळणार्या पदाधिकार्यांमधील नसलेली दुरदृष्टीतेचा फटका आजपावेतो शहादा शहरवासियांना बसलेला आहे.
पाणीपट्टी भरूनही सुविधा नाही
शहराच्या पाण्याचे नियोजन मात्र तत्काळ करुन शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी त्वरित प्रशासनाने तरी लक्ष घालायला हवे, हीच अपेक्षा आज तरी सर्वसामान्यांची आहे. २००० पाणीपट्टी अनेक वर्षांपासून नगरपालिका शहरवासियांकडून वसुल करते आहे. मात्र शहरवासियांना पाणी मात्र मिळत नाही. केवढी मोठी शोकांतिका आहे. शहादा शहराची जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या सगळ्या मोटारी एकाच वेळेस खराब होतात. पाण्याची पाईपलाईन टाकणारा ठेकेदार त्याच्या मनमानीने पाईपलाईन टाकतो आहे. त्यात कोणतेच तांत्रिक मार्गदर्शन न घेता न देता फक्त ठेकेदाराला जसे जमेल तसे ठेकेदाराने ही पाईपलाईन अंथरली मात्र यात किती कामाचे बारा वाजले आहेत याच्याकडे कोणाचेच लक्ष नाही. शहरात व सारंगखेडा ते शहादापर्यंत जी पाईपलाईन टाकण्यात आली आहे ती अनेक ठिकाणी गळत असल्याचे चित्र आहे. याचाच अर्थ अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम ठेकेदाराने केले आहे.
नव्या नगराध्यक्षांकडून अपेक्षा
नंदुरबार जिल्ह्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे शहादा शहर हे अनेक वर्षापासून प्रचंड समस्यांना सामोरे जात आहे. अनेक राजकारण्यांनी प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळेस शहरावासियांच्या तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार केला मात्र विकासकामांकडे हेतूत दुर्लक्ष केले. वास्तविक पहाता शहरावर आतापावेतो बहुतेक काँग्रेस पक्षाचीच सत्ता राहिलेली असतांना व त्याचसोबत केंद्रात आणि राज्यातही काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असूनही शहराला हवा तेवढा म्हणण्यापेक्षा कामांना लागणारा निधी कधीच देण्यात आला नाही. शहरवासियांना नेहमीच प्रत्येक गोष्टींसाठी तरसत रहावे लागले आहे. शहादा शहराचा विकास ह्याच गोष्टीमुळे अडून पडला आहे. आता शहराला नवीन पक्ष आणि नवीन जोमाचे राजकीय कार्यकर्ते मिळाल्याची चर्चा सगळीकडे आहे. हे शहराच्या ह्या समस्या सोडवू शकतात का? हे तर आता ठरविणार आहे.