पाथरी येथे भावजयीची हत्या करणार्‍या जेठाला जन्मठेपेची शिक्षा

0

जळगाव । तालुक्यातील पाथरी येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून 20 ऑगस्ट 2015 रोजी सकाळी 6.15 वाजेच्यासुमारास जेठाने भावजई वृंदा सुनिल पाटील हिचा केळीच्या बेन तोडण्याच्या कोयत्याने वार करून खून केला होता. यानंतर पाथरी येथील पोलिस पाटलाच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला सत्र न्यायाधीश के.पी.नांदेडकर यांच्या न्यायालयात सुरू होता. त्यात गुरूवारी न्या. नोंदडकर यांनी भावजईचा खुन करणार्‍या जेठ संजय पाटील याला जन्मठेपेची सुनावली आहे. पाथरी येथे 20 ऑगस्ट 2015 रोजी सकाळी 6.15 वाजता संजय शिवराम पाटील याने भावजई वृंदाबाई सुनिल पाटील हिचा कोयत्याने वार करून खून केला. यानंतर सकाळी पोलिस पाटील संजीव प्रकाश लंगरे यांचे घर गाठत त्यांना भावजईचा खून केल्याचे सांगून खुन का केल्याचे कारणही सांगितले. यानंतर लंगरे यांनी म्हसावद आऊटपोस्टला फोन करून पोलिसांना बोलवून घटनेची माहिती दिली.

घटनास्थळाची पाहणी करत जबाब नोंदविले
पोलिसांनी पाथरी येऊन संजय पाटील ह्याला अटक केली होती. तर लंगरे हे पोलिसांसोबत घटनास्थळी पाहणीसाठी गेल्यानंतर प्रमिलाबाई यांच्या घराच्या मागील बाजूला रक्ताच्या थोराळ्यात वृंदाबाई ह्या पडलेल्या दिसून आल्या. यात महिलेच्या अंगावर केळीचे बेन तोडण्याच्या कोयत्याचे वार दिसले होते. त्यानंतर पोलिस पाटील संजीव लंगरे यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दाखल केली होती. त्यावरून संजय पाटील याच्याविरूध्द भादंवि कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. एमआयडीसी पोस्टेचे तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक आर.टी.धारबळे यांनी तपासाला सुरूवात केल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जावून पाहणी करत साक्षीदारांचे जबाब नोंदवून घेतले होते. त्यानंतर सत्र न्यायाधिश के.पी. नांदेडकर यांच्या न्यायालयात खटला सुरू झाल्यानंतर 11 ऑगस्ट 2016 पासून न्यायालयात साक्षीदारांचे जबाबांचे काम सुरू होवून याप्रकरणी सरकारपक्षातर्फे 10 साक्षीदार तपासण्यात आले.

जिल्हा सरकारी वकीलांची ही घटनास्थळी भेट
संजय पाटील याने भावजई वृंदाबाई हिचा खून केल्यानंतर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयात या प्रकरणीचा खटला सुरू झाला होता. यातच खटनेच्या एक वर्षानंतर 20 आगस्ट 2016 रोजी या प्रकरणाचे सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके यांनी पाथरी येथे जावून घटनास्थळाची पाहणी करत संपूर्ण माहिती जाणून घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत या प्रकरणाचे तपासी अधिकारी आर.टी.धारबळे व एक पोलिस कर्मचारी हे देखील सोबत होते.

यांच्या साक्षी ठरल्या महत्वपूर्ण
सत्र न्यायाधिश के.पी.नोंदडकर यांच्या न्यायालयात खटला सुरू झाल्यानंतर 11 ऑगस्ट 2016 पासून न्यायालयात साक्षीदारांचे जबाबांचे काम सुरू होवून सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. केतन ढाके यांनी 10 साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी पोलिस पाटील संजीव प्रकाश लंगरे, पंच चंद्रकांत दाजीबा कोळी, भिका रामदास पाटील, प्रत्यक्ष साक्षीदार यमुनाबाई वसंत पाटील, भाऊलाल बाबुराव पांचाळ, पोलिस कर्मचारी सुनिल अशोग मगरे, प्रकाश अशोक पवार आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. एन.एम.अच्छा, अनिल देववेश्‍वर मेश्राम व तपासी अधिकारी आर.टी.धारबळे यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.

न्यायालयाचा निकाल असा….
वृदंबाई यांच्या खून केल्याप्रकरणी सत्र न्यायाधीश के.पी.नांदेडकर यांनी गुरूवारी निकाल दिला. त्यात न्या. नांदेडकर यांनी आरोपी संजय शिवराम पाटील याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यात भादंवि कलम 302 नुसार जन्मठेपेसह 10 हजार रुपये दंड, दंडाची रक्कम जमा न केल्यास 1 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके यांनी तर आरोपी तर्फे अ‍ॅड. सत्यजित पाटील यांनी काम पाहिले.

अनैतिक संबंधाच्या संशयावरून केला होता भावजायीचा खून
पोलिस पाटलाच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा
सरकारपक्षातर्फे तपासण्यात आले 10 साक्षीदार
न्यायाधीश के.पी. नोंदेडकर यांचा निकाल