स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात ; अटकेतील दोघांवर यापूर्वीही प्राणघातक हल्ला, खूनाचे गुन्हे
जळगाव – रेल्वे स्टेशनवर उतरुन पायी घराकडे जात असताना शिवाजी पुतळ्याजवळून लोकेश वना गंगणे या तरुणाचा धुमस्टाईल दुचाकीवरील तिघांनी मोबाईल लांबविल्याची घटना 27 ऑगस्ट रोजी घडली होती. सीसीटीव्ही फुटेजवरुन स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा छडा लावून भुषण विजय माळी वय 19 , आकाश सुकलाल ठाकूर वय 19 दोघे रा. रा. तुकाराम वाडी या दोन जणांना अटक केली आहे. या दोघांचा साथीदार विशाल कोळी हा फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहे. दोघांकडून गुन्ह्यातील 15 हजाराचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान अटकेतील भुषण व आकाश या दोघांवर जिल्हापेठ पोलिसात खुनाचा व प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल आहे.
या पथकाने लावला गुन्ह्याचा छडा
लोकेश गंगणे हा एका वृत्तपत्राच्या कार्यालयात काम करतो. चाळीसगाव येथून कार्यालयीन कामकाज आटोपून 27 रोजी रात्री 10.30 वाजता लोकेश रेल्वेन जळगावला परतला. पाणी बसस्थानकावर जात असताना शिवाजी पुतळ्याजवळ पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील तिघांनी धुमस्टाईल त्याच्या हातातील 15 हजार रुपये मोबाईल लांबविला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी तपासाबाबत स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम यांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल रविंद्र पाटील, विनोद पाटील, अनिल देशमुख , सुधाकर अंभोरे, अनिल जाधव, अशरफ शेख, दादाभाऊ पाटील, दिपक पाटील, सहाय्यक फौजदार चंद्रकांत पाटील, विजय पाटील, नरेंद्र वारुळे यांचे पथकाला सुचना केल्या होत्या. पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा अभ्यास केला, यात भुषण माळी व आकाश ठाकूर या दोघांनी नावे समोर आली. तसेच चौकातील सीसीटीव्ही फुटेजमध्येही प्रकार कैद झाला होता. त्यानुसार पथकाने दोघांना ताब्यात घेवून जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्याकडून मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.
मामाच्या गावाला येवून केली चोरी
भुषण हा दहावी पास आहे. त्याचे वडील खाजगी बसवर चालक म्हणून काम करतात. भुषण पांडे डेअरी चौकात चायनीजची गाडी लावतो त्याच्यावर यापूर्वीही 2017 मध्ये बेंडाळे चौकातील मारहाणीत एकाच्या मृत्यूप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर आकाश हाही दहावी पास त्याचे वडील केमिकलच्या कंपनीत कामगार आहेत. तोही पांडे चौकात एका नाश्त्याच्या गाडीवर काम करतो. त्याच्यावर यापुर्वी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल प्राणघातक हल्लयाच्या गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. यात फरार विशाल कोळी हा सुरतचा रहिवासी आहे. तो जळगावला त्याच्या मामाच्या गावाला आला होता. घटनेच्या विशालच मागे बसलेला होता व त्यानेच मोबाईल लांबविल्याचे समोर आले आहे.