पादचारी पुलांचा ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ चा निर्णय

0

उपअभियंता संदीप पाटील यांची माहिती

पुणे : मुंबईतील सीएसटी रेल्वे उड्डाणपूल कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील सर्व पादचारी पुलांचे सुरक्षेच्या कारणास्तव ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाचे उपअभियंता संदीप पाटील यांनी दिली. शहरामध्ये सध्या नऊ पादचारी पूल अस्तित्वात आहेत. यातील काही पादचारी मार्ग जुने आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही तपासणी केली जाणार आहे.

निधी उपलब्ध झाल्यावर कामाला सुरुवात

शहरातील सर्व उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेल्या अभिप्रायानुसार या पुलांची दुरुस्तीही करण्यात आली. तर काही उड्डाणपुलांच्या दुरुस्तीची कामे सुरु आहेत. पादचारी पुलांचेही स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार असले तरी सध्या अंदाजपत्रकामध्ये त्यासाठी तरतूद नसल्याने दुरुस्तीच्या कामाला निधी उपलब्ध होण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तरतूद उपलब्ध झाल्यावर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होण्याची शक्यता आहे.