नेरुळ । सानपाडा श्री दत्त मंदिर पादचारी पुलाच्या दोन्ही बाजूस उद्वाहन बसवण्याच्या कामास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रभाग शिवसेना नगरसेविका कोमल वास्कर यांच्या अखत्यारीत येतो. या पुलाच्या पादचार्यांना या पुलावरून चालण्यास त्रास होत होता, तर ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडण्यास चढून जावे लागत होते. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी तर यासंदर्भात नगरसेविका कोमल वास्कर यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला होता. त्यामुळे अनेक दिवसांपासून वास्कर यांचा या उदवाहकासाठी पाठपुरावादेखील सुरू होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन स्थायी समितीत या कामाला मंजुरी देण्यात आली आहे.
50 लाखांचा निधी
हे काम ठाणे लोकसभा क्षेत्राचे खासदार राजन विचारे यांच्या खासदार निधिअंतर्गत करण्यात येणार असून त्यांनी हा कामासाठी आपल्या निधीतून 50 लाख एवढा निधी देऊ केला आहे. या लिफ्टचे काम लवकरच सुरू होणार असून त्याचे लोकार्पण करण्यात येईल. मार्कोंन कंपनीस हे काम देण्यात आले असून लवकरच कामास सूरूवात होणार आहे. या कामामुळे नागरिकांची त्रासातून मुक्तता होणार असून नागरिकांनीदेखील पालिकेच्या या निर्णयावर समाधान व्यक्त करून स्थानिक नगरसेविका कोमल वास्कर यांचे आभार मानले आहेत.