भुसावळात रेल्वे बोर्ड पॅसेंजर अॅम्युनिटी कमेटीची जंक्शन स्थानकाची पाहणी ः प्रवाशांशी साधला संवाद
भुसावळ : पादचारी पूलाच्या संथगतीने सुरू असलेल्या कामास गती द्यावी, ऑक्सिजन प्लॅटची निर्मीती करावी, बॅटरी कारची संख्या वाढवावी, व्हीलचेअरची संख्या वाढवून त्या प्रवेशद्वाराजवळ ठेवण्याची व्यवस्था करावी तसेच स्वच्छतेवर भर देण्यासह रेल्वे प्रवाशांना सर्वोतोपरी सुविधा पुरवण्याच्या सूचना भारतीय रेल्वे बोर्ड पॅसेंजर अमेनुटी कमिटीतर्फे भुसावळ जंक्शनच्या पाहणीदरम्यान रेल्वे प्रशासनाला करण्यात आल्या. भारतीय रेल्वे बोर्डाचे पॅसेंजर अमेनुटी कमिटीतर्फे भुसावळ विभागातील नाशिक रोड, भुसावळ आणि जळगाव या रेल्वे स्थानकांना भेट देऊन तेथील प्रवासी सुविधांची पाहणी केली. गुरूवारी नाशिकरोड स्थानकाची पाहणी करून शुक्रवारी भुसावळ जंक्शनची पाहणी करण्यात आली.
अस्वच्छतेबाबत तीव्र नाराजी
रेल्वेच्या प्रवाशांना मोदी सरकारकडून दिल्या जाणार्या सुविधा प्रवाशांपर्यत पोहोचत आहे का नाही, याची खातरजमा करण्यासाठी समितीतर्फे विविधि रेल्वे स्थानकांची पाहणी केली जता आहे. भुसावळ रेल्वे स्थानकातील कीचन मधील अस्वच्छता पाहून सदस्यांनी नाराजी व्यक्त करीत अस्वच्छतेचे चित्रीकरण मोबाईलमध्ये केले. या पथकात कमिटीचे चेअरमन पी.के.कृष्णदास, सदस्य डॉ.राजेंद्र फडके, हिमाली बल, प्रेमाचंद रेड्डी, रवींद्रन, डॉ.अजीतकुमार, परशुराम महंतो आणि विजयालक्ष्मी यांचा समावेश आहे.
डॉ.फडके यांच्या संकल्पनेचे कौतुक
शुक्रवारी सकाळी दहा वाजता कमेटी भुसावळ स्थानकावर दाखल झाली. प्लॅटफॉर्म पाचवर जात त्यांनी तेथे लावलेल्या मुलगी वाचवा, मुलगी शिकवा ही बेबी डॉल पाहिल्यानंतर डॉ.फडके यांच्या संकल्पनेचे कौतुक करण्यात आले. प्लॅटफॉर्म, प्रवाशांना असलेले पिण्याचे पाणी, गळके नळ आहे का, याची पाहाणी केली. यावेळी मलकापूर येथील वासूदेव राणे यांनी त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी त्यांच्या समवेत एडीआरएम मनोज सिन्हा, वरिष्ठ अभियंता (समन्वय) राजेश चिखले, मंडळ वाणिज्य प्रबंधक बी. अरूण, स्टेशन मास्तर मनोजकुमार श्रीवास्तव आदी उपस्थित होते.
प्रवाशांकडून जाणल्या समस्या
कमिटीतील सदस्यांनी प्लॅटफॉर्मवर असलेल्या शेख हुसेन अली (रा. छत्तीसगड), जीयालाल कौल (मध्यप्रदेश) व गीता उपाध्याय (पुणे) यांच्याशी चर्चा करीत त्यांच्याकडून समस्या जाणल्या तसेच प्रवासी सुविधांबाबत काही सूचना करण्याचे सूचवले.