पादचार्‍यांचे मोबाईल हिसकावणारे जेरबंद

0
पिंपरी पोलीस ठाण्यातील चार गुन्ह्यांची उकल
पिंपरी-चिंचवड : रस्त्याने पायी जाणार्‍या नागरिकांचे मोबाईल फोन हिसकावून चोरी करणार्‍या तीन चोरांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून सहा मोबाईल फोन, एक दुचाकी असा एकूण 90 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामुळे पिंपरी पोलीस ठाण्यातील चार गुन्हे उघडकीस आले आहेत. सोमनाथ बाळासाहेब लबडे (वय 20, रा. भोसरी), हृषीकेश शिवाजी मोहिते (वय 20, रा. गव्हाणे वस्ती, आदिनाथ नगर गार्डन जवळ, भोसरी), गौरेश गिरीश नाईक (वय 20, रा. हुतात्मा चौक, आळंदी रोड, भोसरी) अशी चोरट्यांची नावे आहेत.
गुन्हे शाखेची कामगिरी
पादचार्‍यांचे मोबाईल फोन चोरण्याचा घटनांमध्ये वाढ होता आहे. या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे एक पथक काम करत होते. या पथकाला पिंपरी पोलीस ठाण्यातील एका मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी सोमनाथ भोसरी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सोमनाथ याला भोसरीमधून ताब्यात घेतले. त्याने हृषीकेश आणि गौरेश यांच्या मदतीने पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक गुन्हे केल्याचे कबूल केले. त्यानुसार तिघांनाही अटक केली.