नागपूर : विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून सुरू होत आहे. दरम्यान अपेक्षेप्रमाणे अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. विकास पाठोपाठ राज्य सरकारची पादर्शकता वेडी झाल्याचे विरोधकांनी म्हटले. शेतकरी कर्जमाफी, सरकारने जाहिरातबाजीवर केलेला अमाप खर्च आणि जाहिरातीमधील खोटे दावे, वाढती गुन्हेगारी हे मुद्दे विरोधकांच्या अजेंड्यावर असून अधिवेशन गाजणार असे दिसत आहे.
मुख्यमंत्र्यांचा मोबाईल तपासा
अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला विरोधाकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, नागपूरचा फरार गुंड मुन्ना यादव हा मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून पोलिसांनी मुख्यमंत्र्यांचा मोबाईल तपासला तर नागपुरतला फरार गुंड मुन्ना यादवचा शोध लागेल. तर राज्य सरकारवर आरोप करताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले, ओबीसी शिष्यवृत्ती आघाडी सरकारच्या काळात 550 कोटी होती, ती या सरकारने 50 कोटींवर आणली आहे.
युती सरकारमुळे राज्याचे नुकसान
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील सत्ताधार्यांवर हल्लाबोल करताना म्हणाले, ओखी वादळामुळे जेवढे नुकसान झाले नसेल तेवढे युती सरकारच्या काळात झाले आहे. यासोबतच विरोधकांनी शेतकरी कर्जमाफी, खड्डेमुक्त महाराष्ट्र, भ्रष्टाचार हे मुद्दे उचलले आहेत. एकुणच विरोधकांनी सत्ताधार्यांची कोंडी करण्यासाठी चांगलीच तयारी केल्याचे दिसून आले.
हे न्हवं माझं सरकार
उघडा डोळे बघा नीट, भ्रष्टाचार्यांना मिळते क्लीनचिट, अशी पोस्टरबाजी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनापूर्वी पत्रकार परिषदेत विरोधी पक्षांनी केली. राज्य सरकारने तीन वर्षे पूर्ण केल्यावर होय, हे माझं सरकार अशा जाहिराती केल्या होत्या. राज्य सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरल्यामुळे हे न्हवं माझं सरकार अशी टॅगलाईन वापरत विरोधी पक्षांनी सरकारवर हल्लाबोल केला. राज्यातील विविध प्रश्नांवर पोस्टरमधून सरकारला जाब विचारला आहे. सरकारने केलेली जाहिरातबाजी, न मिळालेली कर्जमाफी, मंत्र्यांना मिळणारी क्लीनचिट, राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती याबाबत विरोधकांनी प्रश्न उपस्थित करत सरकारला धारेवर धरले आहे. रविवारी विरोधकांच्या पत्रकार परिषदेच्या वेळी हे न्हवं माझं सरकार ही थीम विरोधकांनी मांडली होती.