नवी दिल्ली| नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगढिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साथ सोडली आहे. त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर पानगढिया अमेरिकेत शिक्षण कार्यात सहभागी होणार आहेत. ते 31 ऑगस्टपर्यंत पदावर कार्यरत राहतील. राजीनामा देत असल्याची माहिती पानगढिया यांनी पंतप्रधान कार्यालयाला दिली असून, अद्याप त्यांचा राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही. नियोजन आयोग रद्द करून पंतप्रधान मोदींनी 2015मध्ये नीती आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाचे पहिले उपाध्यक्ष पानगढिया आहेत.
अंतिम निर्णय अद्याप नाही
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आसामच्या दौर्यावर आहेत. त्यामुळे अद्याप पानगढिया यांच्या राजीनाम्यावर त्यांच्याकडून अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. 64 वर्षाय अरविंद पनगढिया नीती आयोगाचे उपाध्यक्ष होण्यापूर्वी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या सल्लागार समितीचे प्रमुख होते. अमेरिकेच्या कोलंबीया विद्यापीठात ते भारतीय अर्थशास्त्र विषयाचे ते प्राध्यापक होते. पनगढिया यांनी वर्ल्ड बँक, आयएमएफ आणि एडीबीमध्ये मोठ्या पदांवर काम केले आहे.
राजीनाम्यामुळे आश्चर्य
65 वर्षांत 12 पंचवार्षिक योजना आखणार्या नियोजन आयोगाचे नाव बदलून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीती आयोग असे केले होते. या नीती आयोगाचे पनगढिया पहिले उपाध्यक्ष आहेत. नॅशनल इन्सिट्यूट फॉर ट्रांसफॉर्मिंग इंडिया असा नीती आयोगाचा अर्थ आहे. मोदी सरकारने या आयोगाला केंद्र आणि राज्याच्या आर्थिक विकासासाठी थिंक टँक म्हणून सादर केले. नियोजन आयोगाप्रमाणेच नीती आयोगाचे अध्यक्षसुद्धा पंतप्रधान आहेत. यासोबतच सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशातील उप-राज्यपाल या शासकीय परिषदेचे सदस्य आहेत. पंतप्रधान अध्यक्ष असल्याने या आयोगाची मुख्य जबाबदारी उपाध्यक्षांकडेच असते. यामुळे पनगढिया यांनी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.