पानसरेंच्या मारेकर्‍यांवर 10 लाखांचे बक्षीस

0

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपींची माहिती देणार्‍यास राज्य सरकारने 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. मारेकर्‍यांची माहिती देणार्‍यास बक्षीस जाहीर करण्याचा प्रस्ताव विशेष तपास पथकाने राज्य सरकारकडे पाठवला होता. सरकारने हा प्रस्ताव मान्य करत आरोपींविरोधात बक्षीस जाहीर केले आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे-पाटील यांनी ही माहिती दिली. सीबीआयने याआधीच दोन्ही संशयितांवर 5 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.

पवार, अकोलकर फरार
विनय पवार व सारंग अकोलकर हे पानसरे हत्याकांडातील प्रमुख संशयित आरोपी आहेत. पानसरे यांच्या पत्नी उमा यांनीही या दोघांचे फोटो ओळखले आहेत. याशिवाय एका साक्षीदारानेही पवार आणि आकोलकर पिस्तूल मिळवण्यासाठी बिंदू चौकातील दुकानात आल्याची साक्ष पोलिसांकडे दिली आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेला समीर गायकवाड याच्याशी या दोघांचाही संपर्क आल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र, पानसरे यांची हत्या झाल्यापासून हे दोघीही फरार आहेत. त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंटही बजावण्यात आले आहे.