हत्येला तीन वर्षे पूर्ण
पुणे : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला मंगळवारी तीन वर्षे पूर्ण झाली. अजूनही कॉम्रेड पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी मोकाट आहेत. या मारेकर्यांना लवकरात लवकर पकडावे, या मागणीसाठी पुणे, कोल्हापूरसह राज्यभरात शांततेच्या मार्गाने निदर्शने करण्यात आली. मारेकर्यांना शोधण्यात तपास यंत्रणांना अपयश येत आहे. या प्रकरणातील दोन संशयितांना जामीन मिळाला असून, तपासयंत्रणा काय करतात, असा प्रश्न विचारला जात आहे.
पुण्यात शिंदे पुलावर निषेध
कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्येला तीन वर्षे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला 54 महिने पूर्ण झाले. तरीही या दोन विचारवंतांचे मारेकरी सापडलेले नाहीत. त्याविरोधात पुण्यातील महर्षी शिंदे पुलावर निषेध करण्यात आला. याच ठिकाणी नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली होती. नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे, 93 वर्षांच्या सामाजिक कार्यकर्त्या शांताबाई रानडे यांसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. उच्च न्यायालयानेही दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणाचा छडा न लागल्याने तपास यंत्रणांवर नाराजी व्यक्त केली होती.