मुंबई । सार्वजनिक चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या प्रतिबद्धतेला पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी जागतिक जल दिनानिमित्ताने पानी फाउंडेशनने राज्यव्यापी जलमित्र मोहीम छेडली आहे. पानी फाउंडेशनच्या संस्थापिका किरण राव यांनी संस्थेचे सीईओ सत्यजीत भटकळ यांच्या साथीने या उपक्रमाची घोषणा केली. दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी आखलेल्या या मोहिमेत सहभागी होण्याची इच्छा असलेल्या कोणालाही स्वतःला जलमित्र म्हणून https://jalmitra.paanifoundation.in या संकेतस्थळाला करता येईल. या संकेतस्थळावर असलेल्या अर्जात तीन प्रकारचे उपक्रम नोंदवण्यात आले आहेत. यापैकी कोणत्याही उपक्रमात अर्जदार व्यक्ती सहभागी होऊ शकते. यात पाणलोट बंधारे उभारण्यासाठी 1 मे रोजी होणारे श्रमदान (ऐच्छिक हाती केलेले काम), गावांना आवश्यक असणारी उपकरणे पुरवणार्या भारतीय जैन संघटनेला वित्तसहाय्य आणि अधिक सखोल स्वयंसेवक प्रतिबद्धता या उपक्रमांचा समावेश आहे.
1 मे रोजीच्या महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात येणारे श्रमदान हा जलमित्र उपक्रमाचा महत्त्वाचा भाग असून, महाराष्ट्रातल्या शेकडो गावांमध्ये सकाळी व संध्याकाळी अशा दोन सत्रांत हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सत्यमेव जयते वॉटर कप 2018च्या सायंकाळी जलमित्र हा उपक्रम सादर करण्यात आला. पाणलोट व्यवस्थापन व जलसंधारण या प्रक्रियांबाबत 8 एप्रिल 2018 पासून गावागावांमध्ये खास स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. 2018 हे वॉटर कपचे तिसरे वर्ष असून महाराष्ट्रातल्या 24 जिल्ह्यांतल्या 75 तालुक्यांतील 6 हजारांहून अधिक गावांनी यंदा या मोहिमेत सहभाग घेतला आहे. राज्यात सर्वोत्तम तीन गावांमध्ये समाविष्ट होणार्या गावांना अनुक्रमे 75 लाख रुपये, 50 लाख रुपये आणि 40 लाख रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्तम गावाला 10 लाखांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. 2016 व 2017 या दोन्ही वर्षांतील सत्यमेव जयते वॉटर कप उपक्रमांतून एकूण 10 हजार कोटी लीटर पाण्याची साठवणूक करण्यात आली. पानी फाउंडेशनच्या www.paanifoundation.in या नव्या संकेतस्थळाचेही अनावरण केले असून, या संकेतस्थळावर पाणलोट व्यवस्थापनासंबंधीच्या अनेक स्वावलंबी कामांविषयीच्या फिल्म्स देण्यात आल्या आहेत.
सरकारच्या मदतीमुळेच उपक्रम यशस्वी
याप्रसंगी बोलताना पानी फाउंडेशनच्या सहसंस्थापिका किरण राव म्हणाल्या, समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या लोकांना सोबत घेऊन पानी फाउंडेशनचा आजवरचा प्रवास यशस्वी झाला आहे. महाराष्ट्र सरकारचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्यामुळे वॉटर कप अधिक यशस्वी होण्यास मदत झाली.’ या मोहिमेबाबत बोलताना पानी फाउंडेशनचे सीईओ सत्यजीत भटकळ म्हणाले, शहर आणि गाव यांतली मोठी दरी भरून काढण्यासाठी एक व्यासपीठ उभारणे हा जलमित्र या उपक्रमामागचा मूळ हेतू आहे तसेच गावा-गावांतला दुष्काळ दूर करण्यासाठी शहरी लोकांची आस्था व्यक्त करण्याचा सकारात्मक व साधा मार्ग आम्ही यातून उपलब्ध करून दिला आहे.’झी मराठीवरील आगामी तुफान आलंया’ या नव्या शोबद्दलही या दोघांनी माहिती दिली. या नव्या शोमध्ये पानी फाउंडेशनचे सहसंस्थापक आमीर खान यांच्यासह प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र जोशी आणि गीतांजली कुलकर्णी आपल्याला दिसणार आहेत. वॉटर कपमध्ये सहभागी झालेल्या ग्रामीण भागांतील स्त्री, पुरूष व मुलांच्या धाडसाच्या आणि कष्टाच्या कथा या शोमधून आपल्यासमोर मांडण्यात येणार आहेत.