पहिली कार्यशाळा संपन्न
चाळीसगाव –गेल्या २०१६ पासून राज्यात अभिनेता आमिर खान मार्गदर्शनाने आजवर ७५ तालुक्यामधून गाव पाणीदार करण्याची चळवळ सुरू झाली आहे. त्यामुळे ही गावे पाणीदार झाली असून जळगाव जिल्हातून चाळीसगाव तालुक्याचा सत्यमेव जयते ‘वॉटर कप’ स्पर्धेत समावेश झाल्याने येत्या काळात ‘मन संधारणातून जलसंधारण’ करून चाळीसगाव तालुका पाणीदार करून राज्यात पहिल्या क्रमांक मिळविण्यासाठी सर्वांच्या सहकार्यातून ही चळवळ जोमाने पुढे न्यायची आहे असे आवाहन आमदार उन्मेष पाटील यांनी केले.
अभिनेता आमिर खान व किरण राव यांच्या मार्गदर्शनातून सुरू असलेल्या पानी फाऊंडेशनच्या वतीने , तहसीलदार, कृषी विभाग व पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळा हंस चित्रपट गृहात पहिली कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.
यावेळी तहसीलदार कैलास देवरे, जिल्हा परिषदेचे सभापती पोपट भोळे, पंचायत समितीचे सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, तालुका गटविकास अधिकारी अतुल पाटील, नायब तहसीलदार विशाल सोनवणे, राज्याचे मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, पंचायत समितीचे सदस्य दिनेश बोरसे, भाऊसाहेब पाटील नगरसेवक संजय पाटील, पानी फाऊंडेशन जिल्हा समन्वयक विकास गायकवाड यांच्या उपस्थितीत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी तालुक्यात कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच व विविध संस्थेचे पदाधिकारी यांच्या सह शेकडो ग्रामस्थ कार्यशाळेत सहभागी झाले होत. सूत्रसंचालन तालुका समन्वयक विजय कोळी यांनी केले.