नवी मुंबई : तरुणीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे एका बॅगेत भरून ती नेरूळ पामबीजलगत असलेल्या तलावात फेकून दिल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने एकच खळबळ माजली असून बॅगेत सापडलेल्या तरुणीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीची अद्याप ओळख पटली नसून तिची हत्या का करण्यात आली पोलीस याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पुढील तपास क्राईम पी आय राजेंद्र पाटील करत आहेत.
शरीराचे केले पाच ते सहा तुकडे
करावे गावात राहणारे महेंद्र तांडेल सोमवारी सकाळी नेरूळ पामबीजलगत असलेल्या टी एस चाणक्यच्या मागील बाजूने जात असताना त्यांना त्या ठिकाणी एक बॅग आढळून आली. बॅगेत काहीतरी असल्याचा संशय त्यांना आला असता त्यांनी तत्काळ या प्रकरणी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता त्या ठिकाणी बॅगेची तपासणी केली. त्यावेळी बॅगेत तरुणीचे पाच ते सहा तुकडे करून तिची हत्या करण्यात आले असल्याचे पोलिसांना आढळून आले. तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याने हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ज्या ठिकाणी बॅग टाकण्यात आली. त्या ठिकाणी कसलाही वावर नसून मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे आहेत. तर आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेर्याचा अभाव असल्याने हत्या करणार्या इसमाने सदर मयत तरुणीला दिवसा अथवा रात्री कोणत्या मार्गाने आणले पोलीस याचा शोध घेत आहेत.
यापूर्वीही घडले होते हत्याकांड
यापूर्वीही त्याच मार्गावर एका जळलेल्या महिलेचा मृतदेह सापडला होता. त्या महिलेची मुंबईमधील तरुणाने हत्या करून तिचा मृतदेह पामबीज खाडीलगत असलेल्या झाडीत टाकून त्याला जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी शोध घेऊन त्या तरुणाला अटक केली असता सदर प्रकार उघडकीस आला. त्या नंतर सदरील घटना घडल्याने त्या दिशेनेही तपास सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.