मुंबई: डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांच्या जामीन अर्जावरील सुनावणी हायकोर्टाने २५ जुलैपर्यंत तहकूब केली आहे. दरम्यान, आरोपींविरोधात आज किंवा उद्या सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी माहिती गुन्हे शाखेने हायकोर्टात दिली.
डॉक्टर हेमा अहुजा (२८), डॉ. अंकिता खंडेलवाल (२७) व डॉ. भक्ती मेहरे (२६) या तिघींनी जातिवाचक शेरेबाजी करून रॅगिंग करत तिला आत्महत्येस प्रवृत्त केले, असा आरोप आहे. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. तिघींनी सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले होते. मात्र, न्यायालयाने ते फेटाळले होते. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात तिघींनी हायकोर्टात अपिल केले आहे. हायकोर्टानं आज तिघींच्या जामीन अर्जावरील सुनावणी गुरुवारपर्यंत (२५ जुलै) तहकूब केली आहे. दरम्यान, आरोपपत्र तयार असून, ते आज किंवा उद्यापर्यंत सत्र न्यायालयात दाखल करण्यात येईल, अशी माहिती मुंबई क्राइम ब्रांचनं हायकोर्टात दिली.