चिंचवड- पिंपरी-चिंचवड शहरातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन द्यावे या उद्देशाने चिंचवडच्या पायल नृत्यालयाच्यावतीने मासिक नृत्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी नृत्योन्मेष’ ही मासिक नृत्यसभा होणार आहे. दर महिन्याला नृत्याची पर्वणी यामुळे नागरिकांना मिळणार आहे. शहरात पहिल्यांदाच शास्त्रीय नृत्याकरिता नृत्यसभा आयोजित करण्यात येत आहे. चिंचवडच्या राम मंदिरात येत्या 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच ते आठ या वेळेत नृत्य सभा आयोजित केली आहे. हा कार्यक्रम सगळ्यांकरिता खुला असून नि:शुल्क असणार आहे. राम मंदिरातील हॉलमध्ये हा कार्यक्रम होईल.
विविध नृत्यप्रकार पहाता येणार
यासंदर्भात बोलताना पायल नृत्यालयाच्या संचालिका पायल गोखले म्हणाल्या की, विविध नृत्य प्रकार पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी शहरवासियांना मिळावी हे नृत्यसभेचे उद्दीष्ट आहे. तसेच शहरातील आणि शहराबाहेरील कलाकारांचे शास्त्रीय नृत्य शहरात सादर होईल आणि कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळेल हेच यामागचे प्रयोजन आहे. दुसरी नृत्यसभा 22 सप्टेंबर रोजी होणार असून वरदा वैशंपायन आणि अपर्णा गांधी यांचे ओडीसी नृत्य पाहण्याची संधी मिळणार आहे. तर तिसर्या सभेत 27 ऑक्टोबर रोजी सुवर्णा बाग आणि विद्यार्थिनी यांचे भरतनाट्यम नृत्य सादर होईल.