अलिबाग : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या मान्यताप्राप्त शाळांमधील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी मैदानिक चाचणी घेण्यात येणार आहे. शासनाने जाहीर केलेल्या वेळापत्रकनुसार या परीक्षा घेणे शाळाना अडचणीचे ठरणार आहे. सर्व मान्यताप्राप्त शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी या चाचणी परीक्षा 16 ते 23 ऑगस्ट या कालावधीत घ्याव्यात. 26 ऑगस्ट रोजी त्याचे प्रपत्र भरून द्यावे असे शासनाने सर्व शाळांना कळविले आहे.
परीक्षांचे नियोजन करताना अडचणी
सर्व इयत्तांच्या परीक्षा एकाच वेळेत घ्यायच्या आहेत. परंतु बहुतांश शाळा दुबार भारतात त्याना जागेअभावी एकाच वेळी या परीक्षा घेणे शक्य होणार नाही. तसेच 24 ते 31 ऑगस्ट या कालावधीत शाळांना गणेशोत्सवाची सुट्टी आहे. त्यामुळे दिलेल्या वेळेत म्हणजे 26 ऑगस्ट रोजी प्रपत्र भरून देणे शक्य होणार नाही. या परीक्षांचे नियोजन करताना शाळा व्यवस्थापनासमोर अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे आम्ही परीक्षा कोणत्या वेळेत घ्यावी . गणेशोत्सवाची सुट्टी रद्द करावी का याबाबत निर्णय घेऊन आम्हाला कळवावे अशी मागणी अलिबाग येथील दत्ताजीराव खानविलकर एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष अमर वार्डे यांनी रायगड जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकार्यांकडे केली आहे.