पायी शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी लायन्स सायकल बँक

0
लायन्स क्लब ऑफ पुणे अग्रसेन आणि क्लब ऑफ वडगाव यांच्यावतीने राबविला उपक्रम
तळेगाव दाभाडे : शाळेमार्फत गरजू तसेच लांब पल्ल्याहून शाळेत पायी येणार्‍या विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षभर सायकली मोफत वापरावयास मिळाव्यात आणि वर्ष संपल्यावर त्या विद्यार्थ्यांनी या सायकली पुन्हा शाळेतच जमा करायच्या. ज्यामुळे हा सायकलचा लाभ दुसर्‍या गरजू विद्यार्थ्यांना घेता येईल.यासाठी लायन्स क्लब ऑफ पुणे अग्रसेन आणि लायन्स क्लब ऑफ वडगांव यांच्यातर्फे लायन्स सायकल बँक सुरु करण्यात आली. या सायकल बँकेचे उद्घाटन मावळ तालुक्याचे आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब ऑफ पुणे अग्रसेनचे अध्यक्ष राजेश अग्रवाल होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संपूर्ण भारतभर बेटी बचाओ हा संदेश घेऊन सायकलवर प्रवास सुरु असलेले सायकल मॅन बिहार येथील जावेद मोहम्मद, प्रकल्प प्रमुख लायन्स क्लब ऑफ वडगांवचे अध्यक्ष सुनीत कदम, विशेष अतिथी लायन्स क्लबचे प्रांतपाल सी.ए.जितेंद्र मेहता, पंचायत समिती मावळचे सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, कॅबिनेट अधिकारी विजय सारडा, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, अग्रवाल समाज लोणावळाचे अध्यक्ष राजीव अग्रवाल, क्लब ऑफ पुणे 21 सेंच्युरीचे अध्यक्ष शमा गोयल, क्लब ऑफ वडगांवचे संस्थापक-अध्यक्ष अ‍ॅड. दामोदर भंडारी, अ‍ॅड. राजेंद्र अगरवाल, सरस्वती गोयल, सुभाष गोयल, शीला अग्रवाल, राजन अग्रवाल, शशी अग्रवाल, द्वारकाजी बन्सल, उमेश अग्रवाल, मनोज अग्रवाल, विस्तार अधिकारी रमजान मोमीन, मावळ तालुका मूल्यवर्धन प्रमुख मनीषा कारंडे तसेच अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
आमदार बाळा भेगडे यांनी या नाविन्यपूर्ण प्रकल्पाला शुभेच्छा देऊन लायन्सच्या कार्याबाबत समाधान व्यक्त केले. लायन्स क्लबचे प्रांतपाल सीए जितेंद्र मेहता यांनी आपल्या मनोगतात लायन्स क्लब प्रांतात करत असलेल्या कार्याची माहिती दिली आणि या प्रकल्पाला अधिक सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. लायन्स क्लबचे कॅबिनेट अधिकारी विजय सारडा यांनी येणार्‍या काळात अधिकाधिक निधी मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. राजेश अग्रवाल यांनी सायकली तसेच सॅनिटरी नॅपकिन्स आणि थंडीसाठी असणारे उबदार जॅकेट्स मावळातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना देण्याचे आश्‍वासन दिले. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भोयरे आणि श्रीराम विद्यालय, नवलाख उंबरे येथे प्रत्येकी 10 नवीन सायकली देण्यात आल्या. स्वागत लायन्स क्लब ऑफ वडगांवचे अध्यक्ष सुनीत कदम यांनी केले. सूत्रसंचालन भूषण मुथा यांनी केले. आभार गटशिक्षणाधिकारी मंगल वाव्हळ यांनी मानले.