एरंडोल । कपाशीच्या पिकावर फवारणी करीत असतांना तहान लागली म्हणुन विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेलेल्या शेतकर्याचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास खडके खु. येथे घडली.
याबाबत माहिती अशी कि खडके खु. येथील चंद्रसिंग दशरथ पाटील (वय 38) हे कपाशीच्या शेतात कीटक नाशक औषधांची फवारणी करत होते. फवारणी करत असतांना त्यांना पाण्याची तहान लागली म्हणुन ते पाणी पिण्यासाठी खडके खु.शिवारातील रामदास ओंकार पाटील यांच्या शेतातील विहिरी जवळ गेले. विहिरीतून पाणी काढत असतांना विहिरी जवळ असलेल्या दगडावर त्यांनी पाय ठेवला असता दगड घसरल्यामुळे ते विहिरीत पडले.
दुसर्या दिवशी तरंगले प्रेत
विहिरीत सुमारे चाळीस फुट पाणी होते.सायंकाळी चंद्रसिंग पाटील हे घरी न आल्यामुळे त्यांच्या परिवारातील सदस्य व ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली असता कीटक नाशक फवारणी पंप विहिरीच्या बाजूला पडलेला दिसुन आला. ग्रामस्थांनी विहिरीत पहिले असता अंधारामुळे काहीही दिसुन आले नाही. त्यामुळे शनिवारी सकाळी पुन्हा विहिरीत पहिले असता चंद्रसिंग पाटील यांचे प्रेत पाण्यावर तरंगताना दिसुन आले.
अकस्मात मृत्यूची नोंद
एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शव विच्छेदन करण्यात आले. मयत चंद्रसिंग पाटील यांचे पश्चात पत्नी व तीन लहान मुली असुन घरातील ते कर्ते पुरुष असल्यामुळे त्यांच्या परीवारासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यांच्या परिवारास शासकीय मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.याबाबत पोलीस पाटील चंद्रकांत आत्माराम पाटील यांनी दिलेल्या माहिती वरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सिकंदर पिंजारी तपास करीत आहे.