इंदापूर : एकविसाव्या शतकातील महिलांनी अनिष्ठ रूढी परंपरेला फाटा देवुन, पारंपरिक उबंरठा ओलांडल्याने देशात महिला आघाडीवर असल्याचे प्रतिपादन माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथिल नगरपरिषद मैदानावर आयोजित जागतीक महिला दिन कार्यक्रमात केले.
इंदापूर तालुका जिजाऊ फेडरेशन, इंदापूर तालुका महिला काँग्रेस कमिटी व इंदापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा व मुलींचा गुणगौरव व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा,शिक्षण प्रसारक मंडळाचे सचीव मूकुंद शहा, काँग्रेस कमेटीचे तालुकाध्यक्ष कृष्णाजी यादव, नगरपरिषद गटनेता कैलास कदम, जिल्हा परिषदेच्या सदस्या रत्नप्रभादेवी शहाजीराव पाटील, कर्मयोगींच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्या स्वरुपाराणी जयसिंह मोहिते पाटील,इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा आदि उपस्थित होते.यावेळी शब्दसम्राज्ञी डॉ. स्वाती शिंदे पवार व मुक्त पत्रकार अश्विनी सातव डोके या व्याख्याते म्हणून उपस्थित होत्या.
महिला संशोधन ते शेतीत अग्रेसर
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, सध्या शिक्षणाने महिला सक्षम बनल्या असून,त्यांच्यावर जुन्या रूढी परंपरेनुसार पारंपरिक उंबरठ्या बाहेर पाऊल ठेवू नका अशी म्हणण्याची वेळ सध्या येत नाही .कारण सध्या कोणत्याही घरांना उंबरठा राहिलेला नाही. माणसे सहजासहजी मोठी होत नसतात त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. सध्या महिला संशोधना पासून शेती सुध्दा उत्कृष्टपणे करत आहेत. या वेळी बोलताना मुक्त पत्रकार अश्विनी सातव म्हणाल्या, आधुनिक कपड्याच्या वापरामुळे महिलांवर अन्याय होतो असे वक्तव्य काही जाणकार करतात पण त्यात सत्य नाही.मानवी मनातील विकृती बदली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. डॉ.स्वाती शिंदे म्हणाल्या, राजमाता जिजाऊंनी पहिली बँक सुरू केली होती.तसेच स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न छछत्रपती शिवाजी महाराजांनी सत्यात उतरविले. तर सावित्रीबाई फुल जोतीराव फुलेे यांचेमुळे या देशातील सर्वांना शिक्षण मिळाले. माता रमाबाई आंबेडकरांच्यामुळे घटनेचे शिल्पकार आपणास मिळाले.