पारंपरिक वाद्यांसह श्रमिक मंडळाच्या मिरवणुकीत महिलांचा जागर

0

हडपसर । श्रमिक मित्र मंडळाने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गणपती विसर्जन मिरवणुकीत ढोल, लेझीम, पारंपरिक मर्दानी खेळ, महाराष्ट्रीय हलगी पथक, राजस्थानी नृत्य सादर करत गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

अकराव्या दिवशी श्रमिक मित्र मंडळाने पारंपरिक मिरवणूक काढून मंडळाची परंपरा कायम ठेवली आहे. मंडळाचे अध्यक्ष संदीप दळवी यांनी नियोजनपूर्ण मिरवणुकीचे आयोजन केले होते. मंडळाला 25 वर्ष पूर्ण झाल्याने पारंपरिक मर्दानी खेळ, कडकडाक हलगी पथक, लेझीम पथक, ढोल पथक, राजस्थानी नृत्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी मराठी चित्रपटातील अभिनेत्री अमृता खानविलकर फेटा घालून मिरवणुकीत सहभागी झाल्याने, महिला व युवकांची तिला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

मिरवणूक 15 नंबर ते गाडीतळ
आमदार योगेश टिळेकर, भाजप हडपसर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष सुभाष जंगले, नगरसेविका उज्ज्वला जंगले, भूषण तुपे, विकास रासकर, रवी तुपे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाहतुकीचे नियम पाळा, मुलगी वाचवा-मुलगी शिकवा, चिनी वस्तूंवर बहिष्कार, स्वदेशीचा वापर करा व महिला सक्षमीकरणाच्या घोषणा देत सामाजिक प्रबोधन करत जनजागृती करण्यात आली. मिरवणूक पंधरा नंबर ते गाडीतळ उत्कर्षनगरपर्यंत काढण्यात आली. मंडळाचे स्वयंसेवक व हडपसर पोलिसांच्या उपस्थित अतिशय शिस्तबद्ध मिरवणूक पार पडली.