जळगाव । चौकाचौकांत कल्पकतेने रचलेल्या गोवर्या, मध्यभागी उभा केलेला ऊस, एरंडाच्या डहाळीला बांधण्यात आलेले खोबर्याच्या वाट्यांचे तोरण, होळीची पूजा, होळी पेटविल्यानंतर होणार्या जल्लोषाने शहर व परिसरातील वातावरणात आज चैतन्य निर्माण झाले होते. अशा चैतन्यमय वातावरणात जळगाव शहरासह उपनगरांमध्ये सायंकाळी होळी पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली.होळीला पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला. यासह दिवसभर अनेक संस्थांनी पर्यावरणपूरक व व्यसनांची होळी करुन सामजिक संदेश दिलेत.
मोठ्या होळ्या सजल्या
फाल्गुन पौर्णिमा म्हणजे हुताशनी पौर्णिमेला भारतीय परंपरेनुसार होळी उत्साहाने करण्याची प्रथा आहे. शहर व परिसरात गल्लीबोळात, चौकाचौकांत सकाळपासूनच होळीची तयारी करण्यात येत होती. जुने जळगाव, पिंप्राळा, खोटेनगर, गणेश कॉलनी, सुभाष चौक, शनिपेठ, रथचौक, बालाजी पेठ, नेरी नाका, शिवाजीनगर, हुडको, महाबळ, काव्यरत्नावली चौक, आरटीओ कार्यालय आदी ठिकाणी मोठ्या होळ्या रचण्यात आल्या. काही ठिकाणी गोवर्यांवर टाकण्यात आलेल्या आकर्षक रंगाने होळी रंगीत झाली होती. त्यात लहान मुलांचा दांडगा उत्साह दिसत होता. एरंडाची डहाळी, होळीसाठी लागणार्या गोवर्यांच्या शोधात गौरी पटांगणावर कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. ग्रामीण भागातून खास होळीसाठी तयार केलेल्या गोवर्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या होत्या. यातच शहरात होळीनिमित्त सकाळपासूनच घराघरात पुरणपोळीच्या नैवद्याची तयारी होती. सांयकाळी होळी पेटवून पारंपारिक पध्दतीने होळीची पूजा करण्यात आली. तसेच होळीला पुरणपोळीचा नैवद्य देण्यात आला. अनेक संस्थांनी व्यसनांची होळी करुन व्यसनमुक्तीचा संदेश दिला. काही संस्थांनी कचर्याची होळी करुन पर्यावरणचा संदेश दिला.
डॉ. आचार्य विद्यालयात पर्यावरणपूरक होळी
विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ.अविनाश आचार्य पुर्वप्राथमिक विभागात पर्यावरणपूरक होळी उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान, अग्निला साक्षी ठेवून चांगले गुण आत्मसात करण्याची विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा घेतली. डॉ.अविनाश आचार्य पुर्वप्राथमिक विभागात मुख्याध्यापिका कल्पना बावस्कर यांच्यासह पालक व विद्यार्थ्यांच्या हस्ते होळीचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रम प्रमुख अंजली सोरडे यांनी होळी सणाविषयी व पर्यावरणपूरक होळी कशी साजरी करावी, याबाबत माहिती दिली. त्यानंतर हेतल भंगाळे, राशी गेललोत, जिविका जावळे, वैष्णवी जाधव, अक्षरा कंखरे, तनिष्का कंखरे, केतकी कोठावदे, प्रतिक्षा लोखंडे, आदिती महाजन, सिद्धी पाटील, पलक पाटील, ग्रिष्मा रामकुवर, हर्षा सनांसे, आरणा सराफ, अंशिका वाणी, चैतन्य इप्पर या विद्यार्थ्यांनी ‘आज गोकुळात खेळतो हरी’ या गीतावर नृत्य सादर केले. दरम्यान, होलीकोत्सवानंतर विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंगांची उधळण करीत जल्लोष केला. यावेळी पालक देखील उपस्थित होते.
इको फ्रेन्डली होळी
पिंप्राळा येथील येथील युवकांनी इको फ्रेन्डली होळी साजरी केली. युवकांनी यावेळी घरातील परिसरातील कचरा, टाकाऊ वस्तू, कागदी खोके, वाळलेली पाने गोळा करत होळी साजरी केली. या उपक्रमात दिपक बारी, योगेश बारी, गणेश कोळी, विशाल बारी, गणेश चौधरी, महेश चौधरी, अक्षय बारी, मोहन बारी, पवन बारी, कमलेश बारी, मनोज कुलकर्णी, अतुल पाटील, बंटी वाणी आदी युवक सहभागी झाले होते. यानंतर उपक्रमात सहभागी झालेल्या युवकांकडून पर्यावरण पुरक होळीचा संदेश यावेळी देण्यात आला.
युवाशक्तीची अनाथ बालकांसोबत होळी
वैदिक यात्रा परिवार, युवाशक्ती फांऊडेशन व तेरापंथ किशोर मंडळताील सदस्यांनी रविवारी शिवकॉलनी मधील लिलाई अनाथाश्रम जावून येथील अनाथ बालगोपालांसह होळी साजरा केली. यामध्ये आश्रमातील मुलांनी मुक्तपणे रंगाची उधळण करून धमाल केली. तेरापंथ किशोर मंडळाचे पियुष दोषी, युवाशक्ती फांऊडेशनचे अध्यक्ष विराज कावडीया, मंजीत जांगीड, सचीव अमित जगताप, मितेश गुजर, सुरज बेंडाळे, सौरभ चौबे, विनोद सैनी, नवल गोपाल, सचिन पवार, संदीप सुर्यवंशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहभागी सदस्यांनी होळी, धुलिवंदनावरील कविता सादर केल्या. तसेच हिंदी-मराठी चित्रपटातील होळीवरील गीतांवर नृत्य करीत धमाल केली. यानंतर सर्व मुलांना पिचकार्या, नैसर्गिक रंग हे साहित्य देऊन होळी साजरा करण्यात आली. तसेच पर्यावरण पुरक नैसर्गिक रंगाचा वापर करून धुडवळ साजरी केली. यासह सर्व सदस्यांनी मुलांना जेवन करत एकमेकांविषयी जाणून घेतले. विराज कावडीया यांनी उपस्थित मुलांना होळी व रंगपंचमी साजरी करण्याची पृष्ठभुमी व होळीशी जुळलेला सर्व इतिहास यावेळी सांगितला. तसेच पर्यावरणाचा होणारा जहास थांबवून निसर्गासाठी काम करण्याचे आवाहन देखील त्यांनी मुलांना केले.
व्यसनांची होळी
चेतना व्यसनमुक्ती केंद्र व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने काव्यरत्नावली चौकात व्यसनाची होळी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दलिचंद जैन, उमवी बीसीयुडीचे डॉ.पी.पी.माहुलीकर, भाषा प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ. म.सू.पगारे, चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे नितीन विसपुते, युवाशक्ती फाऊंडेशनचे विराज कावडीया यांच्यासह परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते. व्यसनामुळे समाजात मोठया प्रमाणावर मानसिक, शारीरिक, आर्थिकहानी होत आहे. अनेक कुटुंब या व्यसनापायी उध्दवस्त होत असल्याने चेतना व्यसन मुक्ती केंद्रातर्फे व्यसनाची होळी करण्यात आली.
पर्यावरण पूरक होळी
शहरातील मराठी प्रतिष्ठानकडून आर.टी.ओ. कार्यालय परिसरातील पाला-पाचोडा गोळा करून पर्यावरण पुरक होळी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. होळीचे महत्व म्हणजे होळीची पूजा ही महिलांच्या हस्ते करण्यात येवून, विधीवत दहन करण्यात आले. नगरसेविका सुचिता हाडा, संध्या वाणी, सुरेखा बजहाटे, निलोफर देशपांडे, अनुराधा रावेरकर, माधवी मुळे, सुवर्णा वाणी आदी महिलांनी होळीची पूजा केली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड.जमील देशपांडे, अतुलसिंग हाडा, विजय वाणी, प्रमोद बजहाटे, सतीष रावेरकर आदी उपस्थित होते. होळी साजरी करताना वृक्षाची कत्तल करण्यात येवून पर्यावरणाचा जहास केला जातो, मात्र मराठी प्रतिष्ठानच्या वतीने परिसरातील पाला-पाचोडा गोळा करून त्याची होळी करण्यात आली.
धुलिवंदनासाठी शहरातील बाजारपेठ सजली
जळगाव । धुलिवंदनाच्या पुर्वसंध्येला शहरातील धुलिवंदनासाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. होळीच्या दुसर्या दिवशी धुलिवंदन साजरा करण्यासाठी जळगावकर रविवारी तयारी करतांना दिसले. लहानग्यांपासून ते मोठ्यापर्यंत अतिशय उत्साहात साजरा होणारा धुलिवंदन बेधुंद होऊन रंगण्यासाठी अनेकांनी रंगात न्हाऊन जाण्यासाठी सज्ज झाले असून अलिकडच्या काही वर्षात इकोफ्रेन्डली रंग खेळण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
शहरातील फुले मार्केट, गांधी मार्केट, सुभाष चौक, गणेश कॉलनी, प्रभात चौक व उपनगर परिसरात विविध पिचकर्यांनी दुकाने थाटली आहेत. चायनामेड पिचक-यांही मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाल्या आहेत. पंचपिचकारी, छोटाभिम अशा विविध प्रकारच्या पिचकार्या दुकानात दाखल झाल्या आहेत. विविध प्रकारच्या रंगांची विक्री केली जात आहे. अनेकांनी बाजारपेठेत रंगखरेदीला सुरुवात केली आहे. हिरवा, लाल, जांभळा, केशरी, पिवळा, गुलाबी, निळा, काळा, चॉकलेटी, मोरपंखी रंगाची खरेदी केली जात आहे.
आकर्षक पिचकार्या खरेदीला प्राधान्य
ऑईल कलर, पेस्ट खुब, सुंगंधी कलर पावडर, नैसर्गिक रंगही बाजारात उपलब्ध आहेत. होळीमध्ये आहुती देण्यासाठी साखरेचे हार, कंगण व नारळ खरेदी करण्यात आली आहे. नैसर्गिक रंगांचा मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. लहानमुलांसाठी कार्टुन, पाईप, टँकर यासह अनेक प्रकारच्या पिचकार्या बाजारात उपलब्ध आहेत. लहानगी आकर्षक पिचकार्या खरेदीला प्राधान्य देत आहेत. यंदा ग्राहकांकडून पर्यावरणपूरक इकोफ्रेन्डली रंगाची खरेदी केली जात आहे. यंदा साखरेचे भाव वाढल्याने हार कंगणांच्या किमतीमध्येही भाववाढ झाली आहे. धुलिवंदन सर्वच जण साजरे करत असल्याने मोठा उत्साह पाहावयास मिळतो. पाणी उडविण्यासाठी लहान मुलांसाठी छोटाभिम, डोरेमॉन, मोटु पतलू, स्पायडर मॅन, बंदूक, टँकर, इंडियन पाईप, कासव यासह विविध प्रकारच्या लहान मोठ्या पिचकार्या बाजारात आहेत. 20 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंतच्या पिचकार्यांची किंमत आहे.
संगीताच्या धूनवर साजरी होणार धूळवड
शहरातील नेहरू चौक मित्र मंडळाकडून मनपा समोर सार्वजनिक रंगपंचमीचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी खास युवकांसाठी रेन डान्स व डि.जे.च्या संगीताच्या धूनवर धूडवळ साजरी केली जाणार आहे. यासाठी 15 बाय 40 चे फाऊंटन तयार करण्यात आले आहे. शॉवर व्दारे पावसाच्या पाण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. तसेच महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था देखील करण्यात आली आहे. शहरातील जास्तीत जास्त युवकांनी या ठिकाणी रंगोत्सवात सामील होण्याचे आवाहन नेहरु चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी यांनी केले आहे.
वरद प्रतिष्ठान : प्रेम नगर स्टॉप जवळ सकाळी 9 वाजता वरद प्रतिष्ठाकडून सार्वजनिक धुलिवंदनाचे आयोजन करण्यात आले आहे. डि.जे.च्या संगीत व रंगपंचमीवर आधारीत हिंदी-मराठी चित्रपटातील गीतांची साथ युवकांना लाभणार आहे. त्वचेवर काही विपरीत परिणाम होवू नये यासाठी नैसर्गिक रंगाचा वापर या ठिकाणी केला जाणार आहे. यासह श्रीकृष्ण लॉनवर देखील सकाळी ए.जे.इव्हेंटकडून रंगपंचमीचे आयोजन करण्यात आले असून, डि.जे.सह शॉवर डान्समध्ये युवकांना धमाल करता येणार आहे.