पारदर्शकतेच्या मुद्यावर मनपाला ‘भोपळा’

0

मुंबई । शिवसेनेकडून प्रचारात आर्थिक पाहणी अहवालाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल अर्धवट वाचला, सल्लागारांनी चुकीची माहिती दिली म्हणूनच ते तोंडघशी पडले असा टोला मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला लगावला आहे. तसेच पारदर्शकतेच्या मुद्यावर मनपाला शून्य गुण मिळाल्याचा आरोपी त्यांनी केला. मुलुंडमध्ये त्यांची पहिली प्रचार सभा बुधवारी आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.

दरकपातीची आशा फोल

मुंबई महापालिका देशात एक नंबरची पालिका नसून हैदराबादचा पहिला नंबर असल्याचे सांगत त्यांनी मनपा नंबर वनच्या स्पर्धेत मागे राहिल्याचे निदर्शनास आणून दिले. चुकीचे सल्लागार ठेवल्याने शिवसेनेकडून पारदर्शकतेचा दावा केला जात आहे. उद्धव ठाकरेंच्या सल्लागारांनी अहवाल नीट वाचला असता, तर इज्जत वाचली हे लक्षात आले असते, असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. मुंबई महापालिकेत 20 वर्षे जे सत्तेत आहे, त्यांनी मुंबईसाठी काय केले, असा प्रश्‍न उपस्थित करत आम्हाला केवळ बोट दाखवायचे नाही तर मुंबई चांगली करायची आहे, आम्ही पारदर्शकतेचा आग्रह करतच राहणार, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी ठामपणे सांगितले.

मुंबईचे पाटणा केले : मुख्यमंत्री म्हणाले की, ‘केंद्र सरकारच्या आर्थिक सर्वेक्षणाच्या अहवालाचा शिवसेनेने विपर्यास केला. उद्धव ठाकरेंच्या सल्लागारांनी अहवाल नीट वाचला असता, तर तोंडघशी पडण्याची वेळ आली नसती. अर्धवट वाचले की तोंडघशी पडायला होते. राज्य सरकारमुळेच मुंबई आर्थिक सर्वेक्षण अहवालात तिसरी आहे. पारदर्शक कारभारात हैदराबाद प्रथम आहे. शिवसेनेने मुंबई शहर पाटणा शहराच्या बरोबरीला आणून ठेवले आहे,’ अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.