मुंबई : मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पात सतत उल्लेख केलेला पारदर्शक हा शब्द म्हणजे एकट्या भाजपची मक्तेदारी नाही, असा खोचक टोला मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी भाजपला लगावला. त्यासाठी मुंबईच्या महापौरांनी केलेल्या पत्रव्यवहारांनी स्वच्छ कारभार व वास्तववादी अर्थसंकल्प तयार झाल्याचा दावा महापौरांनी केला.
पालिका महापौर दालनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत महापौरांनी अर्थसंकल्पातील पारदर्शक शब्दाचा समाचार घेतला. अर्थसंकल्पात प्रत्येक प्रकल्पापुढे पारर्दशक शब्द लावला आहे. संपूर्ण अर्थसंकल्पावर भाजपची छाप आहे, असे पत्रकारांनी महापौरांना छेडले असता, पालिकेचा स्वच्छ कारभार असावा अशी शिवसेनेची भूमिका आहे. महापौर म्हणून मी स्वतः आयुक्तांना पत्र व्यवहार करून अर्थसंकल्प वास्तववादी व स्वच्छ करण्याची सूचना केली होती. त्यानुसार हा अर्थसंकल्प तयार झाला आहे. मात्र, काही जणांकडून त्याचा उल्लेख आता पारदर्शक असा होत आहे, अशी टिका त्यांनी भाजपवर केली. तसेच अर्थसंकल्पात कोस्टल रोड, गारगाई, पिंजाळ प्रकल्प, पंपिंग स्टेशन, देवनार क्षेपणभूमीबाबत तरतूदी केल्या असून या अर्थसंकल्पाची योग्य प्रकारे अंमलबजावणी व निधीचा पूर्णतः वापर झाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. सरकारकडून निधी मिळेल याची सांशकता व्यक्त करत जकात हे पालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे. मुंबईत जकात रद्द होऊन, जी.एस.टी लागू होणार आहे. जकातच्या बदल्यात केंद्र व राज्य सरकारकडून पालिकेला दररोज उत्पन्न मिळणार आहे. आधीच राज्य व केंद्र सरकारकडे पालिकेचे कोट्यवधी रुपये थकीत आहेत. सरकारकडून दररोज उत्पन्न न मिळाल्यास पालिकेचा आर्थिक डोलारा सांभाळणे कठीण होईल, असे महापौरांनी सांगितले.