पुणे : चैत्रातच पुन्हा एकदा वैशाख वणवा जाणवू लागला असून रविवारी दुपारी तापमान वाढल्याने उन्हाचे चटके बसत होते. खासगी हवामान संस्था स्कायमेटने केलेल्या नोंदीनुसार पुण्यात रविवारी दुपारी पारा 40 अंश सेल्सियसच्या वर गेला होता. नागपूर, वर्धा, ब्रह्मपुरी या विदर्भातील शहरांसोबत कोकणातील भिरा देखील तापमानाशी स्पर्धा करत होते. संपूर्ण राज्यात तापमानात चांगलीच वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
वेधशाळेचा अंदाज खरा ठरला
मध्य भारतात उच्च दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने तसेच पूर्वेकडून येणार्या उष्ण वार्यांमुळे तापमान वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. येत्या चार दिवसांमध्ये तापमान आणखी वाढणार आहे. दहा एप्रिल रोजी तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता वेधशाळेने एक आठवड्यापूर्वीच व्यक्त केली होती, ही शक्यता रविवारी खरी ठरली. रविवारी मोठ्या प्रमाणात उन्हाचे चटके बसत होते.
विदर्भ, मराठवाडा तापला
मुंबई वेधशाळेने नोंदविलेल्या तापमानानुसार विदर्भ-मराठवाडा 40 च्या पुढे, मध्य महाराष्ट्र 40 अंशाच्या काठावर होता. केवळ कोकण-मुंबईमध्ये तापमान 40 अंशापेक्षा कमी होते. परंतु कोकणातील रायगड जिल्ह्यातील भिरा येथे पुन्हा तापमान वाढले आहे. नागपूर, वर्धा, ब्रह्मपुरी आणि भिरा या चार ठिकाणी 43 अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले आहे. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार सोमवारी (दि. 10) पुण्यातील तापमान कमाल 40 अंश सेलसियस तर मंगळवार (दि.11) आणि बुधवारी (दि. 12) तापमान 41 अंश सेल्सियसवर जाण्याची शक्यता आहे.
कामाशिवाय बाहेर पडू नका
येत्या 48 तासात पुण्यासह राज्यातील उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता हवामान तज्ञ व्यक्त करत आहेत. कामाशिवाय दुपारच्या वेळी बाहेर न पडण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. आता तापमानात सातत्याने वाढ होण्याची शक्यता असल्याने शरीरातील पाण्याची पातळी खालावण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे, असे सांगण्यात आले आहे.