पारिचारकांचे निलंबन रद्द केल्याने सेना-भाजप भिडले!

0

जवानांचा अपमान करणाऱ्याचे निलंबन रद्द करणे ही शरमेची बाब

मुंबई – भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याचे चित्र गुरुवारी विधान सभेत एकमेकांविरोधात भिडल्याचे चित्र पाहायला मिळाले. एकीकडे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निलंबनाची मागणी भाजपचे आमदार करत असताना शिवसेनेचे आमदार हे भाजपचे पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाची मागणी करत होते.

भाजपचे पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल वाईट वक्तव्य केले होते. सीमेवर लढणाऱ्या सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल बोलणाऱ्या परिचारक यांचे निलंबन रद्द करणे ही शरमेची बाब आहे. हा सैनिकांचा घोर अपमान असल्याचे शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी म्हटले.

परिचारक यांचे रद्द केलेले निलंबन मागे घ्यावे आणि प्रशांत परिचारक यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी केली. भाजपचे आमदार हे मुंडे यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी अध्यक्षांच्यासमोर येऊन घोषणाबाजी करत होते. त्याचवेळी शिवसेना आमदार हे परिचारकांचे निलंबन करण्यासाठी घोषणाबाजी करत होते. सेना-भाजप आमदारांचा गदारोळ सुरू असल्यामुळे सुरुवातीला १० मिनिटांसाठी दोनवेळा आणि नंतर १५ मिनिटांसाठी आणि नंतर १२ वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले होते.