पारूपली कश्यप, प्रणॉय उपांत्य फेरीत दाखल

0

कॅलिफोर्निया । पारुपली कश्यपने भारताच्याच आणि पाचव्या मानांकित असलेल्या समीर वर्माला हरवून अमेरिकन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले. अन्य लढतीतमध्ये दुसरे मानांकन मिळालेल्या एच. एस. प्रणॉयनेही स्पर्धेत आगेकूच करताना स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. राष्ट्रकुल विजेता कश्यपने सुमारे सात वर्षांनंतर समीरविरुद्धच्या आतरराष्ट्रीय सामन्यात कमाल दाखवताना उपांत्यपूर्व फेरीत 40 मिनिटांमध्ये 21-13, 21-16 असा विजय मिळवला. या विजयासह बिगर मानांकित कश्यपने समीरविरुद्धच्या आपल्या कामगिरीत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

अन्य लढतींमध्ये दुसरे मानांकन मिळालेल्या प्रणॉयने आठवे मानांकन मिळालेल्या जपानच्या कांता सूनेयामाची स्पर्धेतील आगेकूच संपुष्टात आणली. सुमारे तासभर रंगलेल्या सामन्यात प्रणॉयने सामन्यात 10-21, 21-15, 21-18 अशी बाजी मारली. कश्यप, प्रणॉयने उपांत्य फेरीत विजय मिळवल्यास निर्णायक फेरीत हे दोघे समोरासमोर उभे ठाकतील.

उपांत्य फेरीत कश्यपसमोर कोरियाच्या क्वाँग ही हियोचे आव्हान असेल. तर प्रणॉयचा सामना व्हिएतनामच्या तिएन मिन्ह एनगुएनशी होईल. दुहेरीच्या लढतीत भारताच्या मनु अत्री आणि बी सुमीत रेड्डी या तिसर्‍या मानांकित भारतीय जोडीने पुरुष दहेरीतील उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत भारतीय जोडीने हिरोकी ओकूमारा आणि मासायूकी ओनोडेरा या सातवे मानांकित जपानच्या जोडीवर 21-18, 21-20 असा विजय मिळवला होता.