पारोळा । पंचायत समिती सभापती सुनंदा पाटील यांचे पती पांडुरंग पाटील हे कामात हस्तक्षेप करत असल्याच्या निषेधार्थ येथील पं.स. कर्मचार्यांनी धरणे आंदोलन करुन दिवसभर काळ्या फिती लाऊन कामकाज केले. पांडुरंग पाटील हे सभापतींच्या गैरहजेरीत सभापती कार्यालयात बसून अधिकारी, कर्मचार्यांना अरेरावी करत अपमानास्पद वागणूक देतात. विनाकारण अधिकार गाजवितात अशी कर्मचार्यांची तक्रार आहे. कार्यालय अधीक्षक एस.पी.निंबाळकर, अध्यक्ष अतुल वैष्णव, अभियंता संदीप सोनवणे, मनीषा पाटील, मनीषा सैंदाणे, सी.एम.चौधरी, शिंदे आदी कर्मचारी आदींनी सहभाग घेतला. दरम्यान, यापुढे सभापती सुनंदा पाटील कार्यालयात असतील तरच त्यांच्या दालनात जायाचे, त्यांच्या पतीने बोलविले, काही काम सांगितले तर ते करायचे नाही, वागणूक बदलली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे.