पारोळा : किसान महाविद्यालयाचे सेवानिवृत्त रजिस्ट्रार आत्माराम रामचंद्र पाटील (67) यांनी आजारपणाला कंटाळून हॉटेल ग्रीन पार्क समोरील विहिरीत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. किसान महाविद्यालयाचे सेवा निवृत्त रजिस्ट्रार व साने गुरुजी कॉलनीतील रहिवाशी आत्माराम रामचंद्र पाटील (67) हे कंबर व गुडघेदुखीच्या आजाराने त्रस्त होते. गत दुचाकीने दिलेल्या धडकेत त्यांच्या पायाला गंभीर इजा झाली होती. त्यानंतर त्यांची शस्रक्रिया झाल्याने त्यांचे फिरणे बंद झाले होते. गुरुवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास ते घरातून कोणाला काहीएक न सांगता बाहेर पडले. बराच वेळ झाला तरी ते घरी न आल्याने मुलगा संदेश व राजू यांनी वडिलांचा शोध घेतला. हॉटेल ग्रीन पार्क समोर असलेल्या विहिरीजवळ चप्पल व काठी आढळून आली. या साहित्याची ओळख पटल्यानंतर भय्या चौधरी, कौस्तुभ सोनवणे व इतर युवकांनी विहिरीतून आत्माराम पाटील यांचा मृतदेह बाहेर काढला. वडिलांचा मृतदेह पाहून मुलांनी व एकच हंबरडा फोडला.