जळगाव । पारोळा शहरात चोरट्यांनी अक्षरशः थैमान घातला आहे. शनिवारी 27 रोजी मध्यरात्री शहरात एकाच कॉलनीतील दोन ठिकाणी घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. यात चोरट्यांनी एका घरातून 25 हजार रुपयांची ऐवज लंपास केले आहे. तर दुसर्या घरात चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. भंडारी नगर येथे व्ही.एम.जैन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय बडगुजर हे परिवारासह नाशिक येथे गेले होते. चोरट्यांनी संधी साधत कूलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेला सामान अस्ताव्यस्त करुन चोरटे पसार झाले. बडगुजर यांचे भाडेकरू असलेले नितीन पाटील हे सकाळी उठल्यावर त्यांना चोरी झाल्याचे समजले. त्यानंतर चोरट्यांनी पश्चिम शिक्षक सोसायटीचे कर्मचारी शरद काशिनाथ पाटील यांच्या घरात देखील चोरीचा प्रयत्न केला. उन्हाळा असल्याने पाटील हे गच्चीवर झोपलेले होते. चोरट्यांनी कुलूप उघडून घरात प्रवेश केला. सुटकेस, तिजोरी उघडली. मात्र हाती काहीच लागले नाही. त्यांनी घरात असलेली पर्स लंपास केली. या दोन्ही चोरी प्रकरणी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आलेली आहे.