पार्किंगचे दरवाढ प्रकरण पालिका सभागृहात गाजले

0

मुंबई । पार्किंगच्या दरवाढप्रकरणी पालिका सभागृहात सोमवारी चांगलेच पडसाद उमटले. सर्वपक्षीय सदस्यांनी पालिकेला चांगलेच धारेवर धरले. त्यावर खुलासा करताना नव्या धोरणानुसार मुंबई महापालिकेने सोमवारपासून पार्किंगच्या शुल्कात वाढ केली आहे. या नव्या धोरणानुसार पार्किंग कंत्राटाची जाहिरात देताना महिला बचत गट, अपंग यांचा विचार केला जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सभागृहात दिली.

शिवसेनेचे नगरसेवक व बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकील यांनी शुल्क वाढीबाबत हरकतीता मुद्दा मांडून पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. याबाबतची माहिती देण्याची मागणी प्रशासनाकडे केली. हा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी मंजूर झाला असला, तरी नवे दर लागू करण्यापूर्वी प्रशासनाने याची माहिती गटनेत्यांच्या व सुधार समितीच्या बैठकीत का दिली नाही. शिवाय अनधिकृत पार्किंगवर काय कारवाई करणार याचा खुलासा करण्याची मागणी भाजपने सभागृहात केली.

पार्किंगच्या शुल्क वाढीच्या प्रस्तावाला 2015 साली सुधार समिती व पालिका सभागृहात मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार पालिकेने शुल्कवाढीचे नवे धोरण तयार केले. कुलाबा,चर्चगेट व छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरातील 18 वाहनतळांवर हे नवे दर लागू करण्यात येणार आहेत. सार्वजनिक वाहनतळ, रस्त्यालगतचे वाहनतळ आणि निवासी वाहनतळ यात नव्या धोरणानुसार दुपटीने शुल्कवाढ करण्यात आली आहे. मुंबईतील रस्त्यांवर वाहने उभी करण्याला शिस्त लागावी तसेच वाहतूक व पादचार्‍यांना अडथळा होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने सार्वजनिक वाहनतळ धोरणाची आखणी केली. त्यात सार्वजनिक, रस्त्यालगतचे आणि निवासी असे तीन वाहनतळ गट तयार करण्यात आले. या तीनही गटांतील वाहनतळांवर वेगवेगळे शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेचे नगरसेवक व बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी सोमवारी यावर सभागृहात हरकतीचा मुद्दा मांडून नव्या शुल्काबाबत प्रशासनाने माहिती देण्याची मागणी केली. या प्रस्तावाला 2015 ला मंजुरी मिळाली असली तरी दोन वर्षांनी धोरण लागू करताना नेमके काय धोरण याची माहिती देणे आवश्यक होते. नवे धोरण नेमके काय आहे, अनधिकृत पार्किंगवर प्रशासन काय कारवाई करणार आहे, याचा खुलासा करण्याची मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली.

इथे होणार शुल्कवाढ
फोर्ट बायलेन एरिया 1 आणि 2, वालचंद हिराचंद रोड 1 आणि 2, शिवसागर राम गुलाम मार्ग, पी. एम. रोड, रामजी कमानी (पश्‍चिम), रिगल सिनेमा, एम. जी रोड (पश्‍चिम), बॉम्बे हॉस्पिटल, जे. एन. हरदिया मार्ग, रामजी कमानी (पूर्व), अदी मर्झबान रोड, एमजेपी मार्केट परिसर नं. 1, 2 आणि 3, एम. जी. रोड, बद्रुद्दीन तय्यबजी मार्ग, नरोत्तम मोरारजी मार्ग, हुतात्मा चौक नं. 3, इरॉस चित्रपटगृहासमोरील वाहतूक बेट, नाथीबाई ठाकरसी मार्ग आणि अन्य रस्ता.