सांगवी : मोबाईल विसरला असल्याने चौथ्या मजल्यावर जाऊन येईपर्यंत दुचाकीवर ठेवलेली चाळीस हजार रुपये असलेली पर्स अनोळखी महिलेने चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि.1) सकाळी अकराच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली. मुकुंद शांताराम व्यवहारे (वय 34, रा. काटेपुरम चौक, पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुकुंद हे दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडले होते. बाहेर गेल्यानंतर मोबाईल विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. सोसायटीच्या पार्किंगमध्ये दुचाकी पार्क करून ते चौथ्या मजल्यावर गेले. दरम्यान, एका अनोळखी महिलेने पार्किंगमध्ये येऊन दुचाकीवर ठेवलेली 40 हजार रोख रक्कम असलेली पर्स आणि त्यांच्या आईच्या पर्समधील 1 हजार असे एकूण 41 हजारांची रोकड चोरून नेली. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.