महापौर मुक्ता टिळक यांची माहिती
पुणे : पाच झोनमधील पार्किंग धोरणावर मार्चच्या आधी निर्णय घेतला जाईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी महापालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित होते.
पाच झोनमध्ये प्रायोगिक तत्त्वावर पार्किंगचा प्रयोग केला जाणार आहे. मात्र त्याचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला नाही. आचारसंहितेच्या आधी पार्किंग धोरणाविषयी निर्णय घेतला जाईल, असे महापौरांनी सांगितले.महापालिका प्रशासन ठरवलेल्या रस्त्यांवर हे धोरण कसे अंमलात आणणार याचा आराखडा तयार करेल. तो आराखडा पक्षनेत्यांपुढे सादर केला जाईल. त्यानंतर त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही महापौरांनी नमूद केले. नो पार्किंगसाठीच्या नुसत्या जागा ठरवून उपयोग नाही, तर त्या भागाच्या 500 मीटर परिसरात वाहने पार्क करण्याला जागा आहे का? हे पाहवे लागेल. त्यानंतरच याची अंमलबजावणी करावी लागेल, असे आयुक्त म्हणाले.
जागा व रस्त्यांसाठी सर्व्हे
स्मार्ट सिटी अंतर्गत पार्किंगचा जो प्रस्ताव आहे तो पार्किंग बांधून उपलब्ध करून देण्याविषयीचा आहे. मात्र जागा आणि रस्ते महापालिकेलाच सर्व्हे करून पहावे लागणार आहेत, असे आयुक्तांनी नमूद केले. पार्किंग पॉलिसी मंजूर केली, तरी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तयारी करावी लागणार आहे, असेही आयुक्त म्हणाले.