दादांना आशा; काँग्रेसचे ‘एकला चलो’!

0

पिंपरी-चिंचवड : समविचारी पक्ष कायम सोबत राहावेत व धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊ नये यासाठी काँग्रेसशी आघाडी होणे गरजेचे आहे. पुणे महापालिकेसाठी काँग्रेससोबत आघाडीची चर्चा झाली असून, शक्य तेवढ्या जागा आघाडी करून उर्वरीत मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. तशीच आशा पिंपरी-चिंचवडच्या बाबतीतही आहे, असा आशावाद व्यक्त करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आम्ही शहराचा केलेला विकास आणि विकासाचे आमच्याकडे असलेले व्हिजन या जोरावर मते मागणार असल्याचे येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांनी राज्य व केंद्र सरकारचे वाभाडे काढत, फसवा अर्थसंकल्प, नोटबंदीच्या झळांसह सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या दुटप्पीपणाचाही खरपूस समाचार घेतला. शेवटच्याक्षणी आघाडी करण्यास काँग्रेसने मात्र स्पष्ट नकार दिला असून, सर्व प्रभागात उमेदवार उभे करू, अशी माहिती शहराध्यक्ष सचिन साठे यांनी ‘जनशक्ति’शी बोलताना दिली.

नाही तर मैत्रिपूर्ण लढत देऊ!
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचार शुभारंभाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रपरिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले, समविचारी मतांचे विभाजन टाळण्यासाठी आम्ही आताही काँग्रेससोबत आघाडी करण्यास तयार आहोत. जेथे शक्य होईल तेथे आघाडी अन् जेथे शक्य होईल तेथे मैत्रिपूर्ण लढत आपण देऊ, असा आमचा विचार आहे. त्याबाबत बोलणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी पवार यांच्या समवेत माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापौर शकुंतला धराडे, नाना काटे, योगेश बहल आदींची उपस्थिती होती. पवार म्हणाले, आमची मुंबईत ताकद कमी हे मान्य करतो. मात्र, शिवसेनेचे राजकारण हे मुंबई महापालिकेवर अवलंबून आहे. कारण, तिथे काँग्रेसकडे ताकद आहे. मात्र, त्यांचे आपसात वाद आहेत तर मनसे हे तिथे बॅकफूटवर आहे. मुंबई पालिकेच्या निकालावर राज्य सरकारचे भवितव्य ठरेल. शिवसेना मंत्री राजीनामा राज्यपालांकडे कधी पाठवतात याकडे खरे लक्ष लागून आहे. कारण सरकारमध्ये राहून सरकारवर टीका केली जाते, हा शिवसेनेचा दुटप्पीपणा आहे. यातून सर्वांना महाभारत ऐकायला मिळाले. त्या दोघांत जे साठत गेले त्यातून हे महाभारत घडत गेले व युती तुटल्याचे पवार म्हणाले. यासह त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारचे वाभाडे काढत कायदा आणि सुव्यवस्थेचे हे राज्य नसल्याचे सांगितले.

अन् दादांचा हिरमोड झाला!
पुण्याच्या धर्तीवर येथेही आघाडी होईल, असे वाटत असलेल्या राष्ट्रवादीचा 20 जागांचा फॉर्म्युला काँग्रेसने सपशेल फेटाळला आहे. गेल्यावेळी 128 पैकी राष्ट्रवादीचे 92 तर काँग्रेसच्या 14 जागा निवडून आल्या होत्या. गत बलाबलप्रमाणे यावेळी 20 जागा काँग्रेसला देण्यात येतील, असा फॉर्म्युला राष्ट्रवादीने तयार केला होता. तो काँग्रेसला अजिबात मान्य झालेला नाही. त्यांनी सन्मानजनक प्रस्ताव ठेवला नाही असे सांगून आघाडी होणार नसल्याचे शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी सांगितले. संपूर्ण 32 प्रभांगामध्ये 128 जागा स्वबळावर लढणार असल्याचे सुतोवाचही त्यांनी केले. आम्ही दिलेला सन्मानजनक तोडगा राष्ट्रवादीने मान्य केला नाही. त्यामुळे आता शेवटच्याक्षणी आघाडी होऊ शकत नाही. सर्व 32 प्रभागांमध्ये उमेदवार देण्यात येणार असून ही निवडणूक आम्ही स्वबळावर लढणार असे रणशिंगच साठे यांनी फुंकले असल्याने आघाडीही मोडीत जमा झालेली असून, बहुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झालेले आहे.