पार्थ पवारच्या मागणीला काडीचीही किंमत नाही: शरद पवारांनी नातवाला फटकारले

0

मुंबई: सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. भाजप विरुद्ध आघाडी आणि शिवसेना असे चित्र निर्माण झाले आहे. महाविकास आघाडी सरकारची सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला सीबीआयकडे देण्यास विरोध केला होता. मात्र केंद्राने ते प्रकरण सीबीआयकडे सोपविले. त्यातच राष्ट्रवादीत सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावरून फुट दिसून आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्र्यांची भेट घेऊन सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. दरम्यान आज शरद पवार यांनी पार्थ पवार यांना जाहीर फटकारले आहे.

पार्थ पवार यांच्या मागणीला काडीचीही किंमत नाही, तो अपरिपक्व आहे या शब्दात शरद पवारांनी पार्थ पवारला फटकारले आहे. त्यामुळे आता पवार कुटुंबीयांमध्ये पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यावर काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.

राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा देताना पार्थ पवार यांनी जय श्रीरामचा नारा दिला होता. यावरून देखील राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबीय यांच्यात दुमत दिसून आले होते. यावरूनच शरद पवार चिडले असल्याचे बोलले जात आहे.

मला सुशांत सिंह यांच्या आत्महत्येपेक्षा शेतकरी आत्महत्या मला अधिक महत्त्वाची वाटते. मुंबई पोलिसांवर माझा विश्वास आहे असेही शरद पवारांनी सांगितले.