पार्थ पवार पुन्हा सरकार विरोधात; मराठा आरक्षण प्रकरणी उचलले मोठे पाऊल

0

मुंबई: सुशांतसिंह राजपूत प्रकरणात शरद पवारांचे नातू तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र सुप्रीम पार्थ पवार यांनी सरकारच्या विरोधात जाऊन सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर शरद पवारांनी ‘पार्थ पवारांच्या मागणीला आम्ही काडीचीही किंमत देत नाही’ असे विधान केले होते. त्यामुळे पवार कुटुंबियांमधील मतभेत उघड झाले होते. त्यानंतर आता पुन्हा पार्थ पवार यांनी सरकार विरोधी भूमिका केली आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाच्या अमलबजावणीला स्थगिती दिली आहे. यावरून विरोधक महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका करत आहेत. तर दुसरीकडे पार्थ पवार यांनी देखील आता विरोधी भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणावरुन सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे पार्थ पवारांनी सांगितले आहे. बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाने आत्महत्या केल्यानंतर पार्थ पवार आक्रमक झाले आहेत. पार्थ पवार यांनी ट्विट करत सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.

“मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केल्याची बातमी ऐकून धक्का बसला आहे. अशा दुर्दैवी घटनांची मालिका सुरु होण्याआधी मराठा नेत्यांनी जाग व्हावे आणि लढावे. महाराष्ट्र सरकारने तोडगा काढण्यासाठी पावले उचलावीत अशी विनंती आहे,” अस पार्थ पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पार्थ पवार यांनी ट्विटमध्ये आत्महत्या केलेल्या तरुणाचा आणि त्याने लिहिलेल्या पत्राचा फोटो शेअर केला आहे. “विवेकच्या आत्महत्येने आमच्या मनात जी आग पेटवली आहे त्याने संपूर्ण व्यवस्था खाक होऊ शकते. संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात आहे. सुप्रीम कोर्टात जाऊन हस्तक्षेप याचिका दाखल करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय माझ्यासमोर शिल्लक नाही”असे म्हटले आहे.

बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने मराठा आरक्षण रद्द झाल्याने टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख केला आहे. विवेक यानं नुकतीच नीट परीक्षा दिली होती. माझ्या मृत्यूनंतर तरी राज्य आणि केंद्र सरकारला मराठ्यांच्या मुलांची कीव येईल अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे.