सोशल मिडीयावर पार्थ यांना ट्रोल करणार्यांना सुनावले
पिंपरी चिंचवड : पार्थ पवार यांच्या भाषणाची खिल्ली सोशल मीडियावर उडवली जात आहे. पण, लक्षात ठेवा पार्थ पवार हा लंबी रेस का घोडा आहे, अशा शब्दांत स्वाभीमानी पक्षाचे नेते आमदार नितेश राणे यांनी ट्रोल करणार्यांना सुनावले आहे. राजकीय जीवनातील पहिले भाषण आणि मोठी गर्दी अशा वेळी बोलायला धाडस लागते, असेही राणे यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळमधील अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांनी मतदार संघातील नागरिकांना भावनिक साद घातली आहे. ‘मी नवीन आहे माझी सुरूवात आहे पण, मी निश्चितच पवार साहेब आणि दादांपेक्षा चांगले काम करुन दाखवतो, अशा भावना पार्थ यांनी व्यक्त केल्या.
नाव घेताच कार्यकर्त्यांची घोषणाबाजी…
आपल्या राजकीय जीवनातील पहिलेच भाषण करताना पार्थ पवार यांचा आवाज काहीसा कापरा झाला होता. सभेला झालेली प्रचंड गर्दी व्यासपीठावर शरद पवार यांच्यापासून शेकापचे जयंत पाटील यांच्यापर्यंत सर्व मित्रपक्षांचे दिग्गज नेते उपस्थित होते. अशा विराट सभेत व्यासपीठावर प्रचाराचा नारळ फुटला. पण, राजकीय जीवनातील पहिले भाषण म्हटल्यावर राष्ट्रवादीसह उपस्थित सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पार्थ यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली. सभेचा उत्साह शिगेला पोहोचला होता. अशा परिस्थितीत पार्थ बोलायला उभे राहिले नमस्कार, मी पार्थ अजित पवार असे भारदस्त आवाजातील शब्द उद्गारताच पुन्हा जोरदार घोषणाबाजी सुरू झाली.
मला सांभाळून घ्या…
राजकारणात नवा चेहरा असलेला आणि पहिलेच भाषण करणारा पार्थ काहीसा विचलित झाला पण, त्यातूनही सावरत पार्थ पवार यांनी भाजपच्या कारभाराचे वाभाडे काढले. हे सरकार केवळ ‘डिजिटल’ सरकार आहे असा घणाघात केला. जोरदार घोषणाबाजी आणि प्रचंड गर्दी पाहुन विचलीत झालेल्या पार्थ यांनी सुसंस्कृतपणाचे दर्शन घडवीत, मला सांभाळून घ्या मी चांगले काम करुन दाखवीन, मला संधी द्या… अशी भावनिक साद घातली आणि भाषण आटोपते घेतले. चिंचवड येथील आहेर गार्डन येथे झालेल्या या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे सर्वेसर्वा जयंत पाटील, यासह पिपल्स रिपब्लिकन पार्टी, स्वाभीमानी शेतकरी संघटना यांसह मित्रपक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.