जळगाव – ज्यांची या महापालिकेत सत्ता होती, त्यांचा राज्यात मुख्यमंत्री होता, ते स्वत: पालकमंत्री होते. मात्र पालकमंत्री असतांना जळगाव शहराच्या विकासासाठी दमडी दिली नाही. नुसत्याच 100 कोटींच्या वल्गना केल्या, अशा शब्दात शिवसेनेचे उपनेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपाचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांना जोरदार टोला लगावला. जळगाव शहर महापालिकेत सध्या कोलांटीउड्यांचे राजकारण सुरू आहे. आज देखील हसीनाबाई शरीफ आणि उषा पाटील या दोन नगरसेविकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकार्यांची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बैठक घेतली. या बैठकीत जळगाव शहरातील प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ना. पाटील म्हणाल की, जळगाव शहराच्या विकासासाठी आम्ही 58 कोटींचा निधी आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. आता मात्र भाजपा आम्ही ठरावाला विरोध करू, असे म्हणत राजकारण करीत आहे. विकास होत नाही म्हणून आरोप करायचा आणि दुसरीकडे विरोध करायचा अशी दुटप्पी भूमिका ते घेत आहेत. महापालिकेत सत्ता असतांना निधी आणण्याच्या केवळ वल्गना केल्या. प्रत्यक्षात काहीच दिले नाही.मात्र आम्ही नुसतंच भाषण करून थांबलो नाही, तर निधी आणण्याचे काम करीत आहोत. राज्य शासनाच्या निधीची प्रतीक्षा असली, तरी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून निधी देऊन कामे सुरू तरी झाली असल्याचे ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले