जळगाव । पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची रविवारी शहरातील विविध संघटनांनी भेट घेतली. यात भारतीय जनता पक्ष केमिस्ट महासंघतर्फे महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अनियमित व्यवहार व कथीत भ्रष्टाचाराबाबत निवेदन देण्यात आले. तर जिल्हा क्रीडा कार्यालय व जळगाव जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या प्रशिक्षण केंद्रातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंचा सत्कार पालकमंत्र्यानी केला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा
भारतीय जनता पक्ष केमिस्ट महासंघातर्फे महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अनियमित व्यवहार व कथीत भ्रष्टाचाराबाबत तसेच केमिस्ट बांधवांचे शेअर्सचे पैसे येणे परत बंद झाल्यामुळे भविष्यातील आंदोलन व अमरण उपोषणाबद्दल चर्चा करण्यात आली. याप्रसंगी केमिस्ट शेअर बचाव आघाडीचे संयोजक संजय नारखेडे, प्रदेशाध्यक्ष किशोर भंडारी, महासंघाचे जिल्हाध्यक्ष शाकिरभाई चित्तलवाला, महानगर जिल्हाध्यक्ष निशिकांत मंडोरा, विजय खिवसरा, डॉ. सतीश आगीवाल आदी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्रातील केमिस्ट बांधवांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली. तसेच मागणी मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यात घेण्यात आलेल्या पोलीस भरती परिक्षेत जिल्हा क्रीडा कार्यालय व जळगाव जिल्हा सॉफ्ट बॉल असोिएशनतर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैंदानावरील सॉफ्ट बॉल खेळाच्या प्रशिक्षण केंद्रातील राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभाग घेऊन प्राविण्यप्राप्त खेळाडूंची निवड मेरिटमध्ये झाल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.