जळगाव प्रतिनिधी । नियोजन समितीचे साडेपाच कोटी रूपये दुसर्या कामासाठी परस्पर वळते केल्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांना अधिकार्यांच्या आढावा बैठकीत रूद्रावतार धारण केला.
जिल्हा नियोजन समितीअंतर्गत विविध विभागांच्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी अजिंठा विश्रामगृहावर बैठक आयोजित केली होती. या बैठकीला सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावर्षी जिल्ह्यासाठी ३०१ कोटी रूपये मंजुर आहेत. त्यापैकी ९० कोटी रूपये वितरीत झाले असून ५७ कोटी रूपये खर्च झाले असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. पाच महिन्यात किती खर्च झाला, उर्वरित निधी कधीपर्यंत खर्च होईल. खर्च झालेल्या कामांबाबत नागरिक समाधानी आहेत का? या प्रश्नांचा पालकमंत्र्यांनी प्रत्येक खाते प्रमुखांकडून आढावा घेतला. जिल्ह्यात रस्त्यांवरील खड्ड्यांचा विषय गंभीर असल्याने नियोजन समितीकडून रस्ते दुरूस्तीसाठी पैसे देणे आवश्यक होते. मात्र, जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी रस्त्यासाठी आवश्यक असलेला साडेपाच कोटी रूपयांचा निधी परस्पर नाट्यगृहासाठी वळता केला. यासाठी नियोजन समितीचे अध्यक्ष असलेल्या पालकमंत्र्याची परवानगी घेणे आवश्यक होते. जिल्हाधिकार्यांनी मात्र त्यांना न विचारता त्यांच्या अधिकारात हा प्रकार केल्याने पालकमंत्री आढावा बैठकीत चांगलेच संतापले. तुम्हाला हे अधिकार कुणी दिले ? अशा शब्दांमध्ये त्यांनी जिल्हाधिकार्यांना धारेवर धरले. दरम्यान, कृषी विभाग, आरोग्य, पशुसंवर्धन, सहकारी संस्था, समाज कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, बांधकाम, महिला व बाल कल्याण या विभागाच्या प्रमुखांकडून पालकमंत्र्यांनी आढावा घेतला.